भाऊराव कऱ्हाडेंचा TDM पुन्हा होणार प्रदर्शित ! ‘या’ तारखेला थिएटरमध्ये होणार दाखल

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मराठी दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे आणि त्यांचा टीडीएम सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. मराठी सिनेमाला स्क्रिन्स मिळत नसल्याचे सांगत कऱ्हाडे यांनी प्रदर्शित झालेला सिनेमा मागे घेतला. यानंतर मराठी चित्रपट आणि त्यांना मिळणारे स्क्रिन्स याबाबत पुन्हा वाद सुरु झाल्याचं चित्र दिसून आलं होत. अशात भाऊराव कऱ्हाडे यांनी टीडीएम पुन्हा प्रदर्शित करणार असल्याचे सांगत नवीन तारीख जाहीर केली आहे.
टीडीएमचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची उत्कंठा चांगलीच वाढली होती. ग्रामीण कथेवर आधारित असलेला हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रतिसाद देखील चांगला मिळत होता. अशात दिग्दर्शक कऱ्हाडे यांनी थिएटरमध्ये स्क्रिन्स मिळत नसल्याने चित्रपटाचे प्रदर्शन थांबवत असल्याची घोषणा केली होती. यासंबंधीची माहिती देताना कऱ्हाडे चांगलेच भावूक झाले होते.
टीडीएम चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून दिग्दर्शकाने चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करत असल्याचे जाहीर केले आहे. आपल्या फेसबुकवरून लाईव्ह करत कऱ्हाडे यांनी याबाबतची माहिती दिली. सपोर्ट फॉर टीडीएम या मोहिमेला प्रतिसाद दिल्याबाबद्दल त्यांनी सर्व प्रेक्षकांचे आभार मानले. आपल्या या खंबीर पाठिंब्यामुळे आम्हाला एक नवी उमेद मिळाली आहे आणि याच उमेदीने आम्ही ‘टीडीएम’ चित्रपट पुन्हा प्रदर्शनासाठी सज्ज झालो आहोत. असं म्हणत 9 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘टीडीएम’ प्रदर्शित होत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
टीडीएमचे प्रदर्शन थांबवल्यानंतर कऱ्हाडे यांच्या समर्थनार्थ अनेक संस्था पुढे आल्या होत्या. पुण्यातही याचे पडसाद पाहायला मिळाले होते. ग्रामीण भागात काही ठिकाणी चित्रपट प्रेमींनी मोर्चे काढत टीडीएमला आपला पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आता टीडीएम पुन्हा चित्रपटगृहात लागणार असल्याने सोशल मिडीयावर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला.



