प्रभात वृत्तसेवा काटेवाडी – अभिनयाचे ब्रँड सम्राट तसेच फू बाई फू आणि चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमांतील सुप्रसिद्ध अभिनेते व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे ब्रँड म्बेसिडर भाऊ कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत काटेवाडी (ता. बारामती) येथे या अभियानाचा जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.भाऊ कदम म्हणाले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात काटेवाडी गावाने सक्रिय सहभाग घेतला असून हे गाव क्रमांकात येण्यास पूर्णतः पात्र आहे. हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे गाव असून खासदार सुनेत्रा पवार यांचेही गाव आहे. गाव शिस्तबद्ध असून ग्रामस्थांची एकजूट हेच या यशाचे खरे गमक आहे; मात्र गावाला क्रमांक मिळवण्यासाठी घरपट्टी व पाणीपट्टी भरणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासनाने 50 टक्के रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली असून ग्रामस्थांनी या कालावधीत कर भरण्याचे आवाहन त्यांनी केले. काटेवाडी गावाला यापूर्वी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार, निर्मलग्राम, तंटामुक्त गाव, पर्यावरण ग्राम, आर. आर. आबा स्मार्ट ग्राम, सायबर ग्राम, विमा ग्राम, कृषी ग्राम असे विविध पुरस्कार मिळाल्याचा उल्लेख करत, हे सर्व यश ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे व लोकसहभागामुळेच मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. डिजिटल किमया अॅपच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या सर्व शासकीय योजनांची माहिती उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी खासदार सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, गावाच्या सर्वांगीण विकासातूनच विकसित महाराष्ट्र घडतो. मनोरंजनाच्या माध्यमातून ग्रामविकासाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्याचा हा उपक्रम लोकाभिमुख आहे. भाऊ कदम यांच्या विनोदी शैलीतून दिलेल्या संदेशामुळे ग्रामपंचायत राज व्यवस्था, लोकसहभाग, स्वच्छता व जबाबदारी याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण झाली. होईल गाव विकसित, तर प्रगत होईल देश हा विचार अधिक दृढ झाला. कार्यक्रमादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांच्या उपस्थितीत अंगणवाडी पाहणी, दिव्यांगांसाठी युडीआय कार्ड वाटप, टप्पा दोनमधील घरकुलांचा गृहप्रवेश, वृक्षलागवड तसेच महिला बचत गटांना धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार स्वप्नील रावडे, तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे, वैद्यकीय अधिकारी बापू दडस, डॉ. वैशाली देवकाते, ग्रामपंचायत प्रशासनाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभियानाच्या उर्वरित कालावधीत लोकसहभाग, महिला सक्षमीकरण व शाश्वत विकासावर भर देत काटेवाडी पुन्हा एकदा आदर्श निर्माण करेल, असा निर्धार ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला.