Bhaskar Jadhav : ‘त्या’ वक्तव्यावरून भास्कर जाधवांची रामदास कदमांवर जहरी टीका; म्हणाले….

मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भात वादग्रस्त दावा करत खळबळ उडवली आहे. बाळासाहेबांचे निधन दोन दिवसांपूर्वीच झाले होते, आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना एक दिवस का ठेवले, असा दावा कदम यांनी केला. या विधानाने शिवसेना ठाकरे गट संतप्त झाला असून, विधानसभा गटनेते भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांचा ‘छमछमदास’ आणि ‘बारदास’ असा उल्लेख करत जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
शिंदे गटाच्या मेळाव्यात वादग्रस्त दावा
विजयादशमीच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा नेक्सो सेंटर येथे पार पडला. यावेळी रामदास कदम यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “बाळासाहेबांचे निधन एक दिवसआधीच झाले होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांना एक दिवस का ठेवले? बाळासाहेबांवर उपचार झाल्याचे मला डॉक्टरांनी सांगितले.” या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, ठाकरे आणि शिंदे गटात तणाव वाढण्याची शक्यता आहे.
भास्कर जाधव यांचा कदमांवर हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी कदम यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला. माध्यमांशी बोलताना जाधव यांनी कदम यांचा ‘छमछमदास’ आणि ‘बारदास कदम’ असा उल्लेख करत टीका केली. ते म्हणाले, “कदमांसारख्या श्वानांना आम्ही किंमत देत नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांना दोनदा मुंबईच्या नगरसेवकांमधून विधान परिषदेवर पाठवले, पण मुंबईकरांसाठी कदम यांनी काय केले? बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्याचा आव आणणारे कदम महिलांना नाचवून कमाई करणाऱ्यांना भXXXXX म्हणतात. अशा लोकांकडून दुसरी अपेक्षा नाही.”
कदम चर्चेत राहण्यासाठी वक्तव्य करतात – जाधव
जाधव पुढे म्हणाले की, शिंदे गटात गेल्यानंतर कदम यांना कोणतीही मोठी जबाबदारी मिळाली नाही, त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी ते अशी वक्तव्ये करत आहेत. “नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बोलत नाहीत, त्यामुळे आता कदम यांना पुढे केले जात आहे. त्यांना असे बोलायला कोण सांगत आहे, हे लक्षात घ्या,” असेही जाधव यांनी नमूद केले. या प्रकरणामुळे शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात पुन्हा एकदा तीव्र वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कदम यांच्या वक्तव्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भात नवा वाद उभा राहिला असून, येत्या काळात यावरून राजकीय खडाजंगी तीव्र होण्याची शक्यता आहे.





