पुणे – भारती विद्यापीठ पोलिसांनी फरार सराईत गुन्हेगारास जेरबंद केले आहे. त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात एका रिक्षा चालकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. तर वारजे येथे एका सराईत गुन्हेगाराला ठार मारण्याचा गुन्हा आहे. या दोन्ही गुन्हयात तो फरार होता. त्याच्यावर आजवर एकूण 10 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
निलेश दत्तात्रय सातपुते(28, रा.राजहंस कॉलनी, कोथरुड) असे अटक आरोपीचे नाव आहे .निलेश सातपुते हा रिक्षा चालक आहे,त्याच्या त्रासाला कंटाळून तीन फेब्रुवारी रोजी सुनिल रामचंद्र भरगंडे(47,रा.कात्रज) या रिक्षा चालकाने आत्महत्या केली होती.
सुनिल भरगंडेच्या आत्महत्या प्रकरणी निलेश सातपुतेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून निलेश सातपुते हा फरार होता. तसेच कुख्यात गुन्हेगार रोहीत पासलकर याच्यावर कोयत्याने वार करुन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्हयातही निलेश सातपुते फरार होता. हा गुन्हा वारजे पोलिस ठाण्यात दाखल होता.
दोन्ही गुन्हे केल्यानंतर निलेश पोलिसांना मागील सहा महिणे गुंगारा देत होता. दरम्यान पोलिस कर्मचारी विक्रम सावंत यांना निलेश हा कात्रज परिसरातील शंकर मंदिरात आल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार सापळा रचून त्याला पकडण्यात आले.
ही कारवाई पोलिस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलिस निरीक्षक अर्जुन बोत्रे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक डी.जी.घावटे, पोलिस अंमलदार सोमनाथ सुतार, संतोष भापकर, सर्फराज देशमुख, सचिन पवार, अभिजित जाधव, राहुल तांबे, गणेश शेंडे व विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.