पुणे | भारत माता की जय, झाँसी की राणी अमर रहें

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (दि. १८) अभिवादन करण्यात आले. बालगंधर्व रंगमंदिरासमाारील राणी लक्ष्मीबाई यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यास कऱ्हाडे ब्राह्मण महासंघासह विविध संघटनांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी मॉडर्न गर्ल्स हायस्कूलमधील विद्यार्थिनींच्या आरएसपी, बँड तसेच ढोल-ताशा पथकाने मानवंदना दिली. वंदे मातारम्, भारत माता की जय, झाँसी की राणी अमर रहें, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
शिवाजीनगर येथील बालगंधर्व रंगमंदिरासमोर कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या सहकार्याने राणी लक्ष्मीबाई यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. महापालिकेच्या सहकार्याने या अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, डॉ. सच्चिदानंद शेवडे, कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या अध्यक्षा मुक्ता चांदोरकर, उपाध्यक्ष गिरीश शेवडे, हरिभाऊ मुणगेकर, सचिव बळवंत भाटवडेकर, कोषाध्यक्ष गणेश गुर्जर,
सदस्य डॉ. राजश्री महाजनी, विजय पानवलकर, दीपक भडकमकर तसेच समाजसेवक मिलिंद एकबोटे, डॉ. नंदकिशोर एकबोटे, भाजपाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या युवा समिती उपाध्यक्षा डॉ. निवेदिता एकबोटे, मॉडर्न गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका माया नाईक आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता.
महापालिकेची अनास्था…
राणी लक्ष्मीबाई यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी महापालिकेच्यावतीने उद्वाहकाची व्यवस्था केली जाते. पण, आज अचानक ही सुविधा उपलब्ध होणार नाही, असे कारण देत पुतळ्याऐवजी तेथील नामफलकाला पुष्पहार अर्पण करावा,
असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पुष्पहार अर्पण करण्याची सुविधा दिली जाईल, असे आश्वासन देऊन सुविधा उपलब्ध न केल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.
जोपर्यंत उद्वाहकाची सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही, अशी भूमिका कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर तब्बल एक तासानंतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.





