‘भारत बंद’ला देशभरात कुठे कसा प्रतिसाद मिळाला ?

नवी दिल्ली – अनुसूचित जाती-जमाती आरक्षणातील क्रिमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात बुधवारी वेगवेगळ्या संघटनांनी भारत बंद पुकारला. याचा सर्वाधिक परिणाम झारखंड, बिहार आणि राजस्थानमध्ये दिसून आला. झारखंडमध्ये अनेक ठिकाणी या काळात लोकांनी तीव्र आंदोलन केले. यादरम्यान काही ठिकाणी निदर्शने करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
बिहारची राजधानी पाटणामध्ये आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. सकाळपासून सुरु असलेल्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे पोलिसांना आंदोलकांवर लाठीमार करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
बिहारमधील अनेक भागात भारत बंदचा परिणाम सकाळपासूनच जाणवला. पाटणामध्ये बंद समर्थकांनी महेंद्रू आंबेडकर हॉस्टेलच्या जवळच्या रस्त्यावर आंदोलन केले. बंदच्या दरम्यान कोणताही हिंसाचार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. शहरात शांतता कायम ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
अनेक राजकीय पक्षांनीही भारत बंदला पाठिंबा दिला आहे. ज्यामध्ये बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय लोकदल, आझाद समाज पार्टी (कांशीराम) आणि इतर संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे बंदचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये दिसून येत आहे. भारत बंदचा सार्वजनिक वाहतूक सेवा आणि रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे.
दरम्यान, नुकताच सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील क्रिमी लेयर वर्गाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. या प्रवर्गातील गरजू लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होईल, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.


