वॉशरुमला गेलेल्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू ! धक्कादायक कारण आले समोर

भंडारा : उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यामुळे आता सगळीकडे शाळा सुरु होताना दिसत आहेत. काही ठिकाणी १५ जूनला तर काही ठिकाणी १ जुलैला शाळा सुरू झाल्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून पुन्हा शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असते. मात्र भंडाऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी पहिलीतील विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे. चिमुकलीच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
चिमुकलीसोबत नेमके काय घडले?
यशस्वी सोपान राऊत असे मृत पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे. भंडारा जिल्ह्यातील पुयार येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तिने नुकताच पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. 1 जुलै रोजी शाळा सुरू झाली होती. बुधवारी 3 जुलैला यशस्वी राऊत सकाळच्या सुमारास शाळेत आली. तेव्हा शाळेत लावण्यात आलेल्या ROच्या तारेचा करंट लागला आणि ती स्वच्छतागृहातच बेशुद्ध होऊन पडली.
स्वच्छतागृहात 6 वर्षांची चिमुकली बेशुद्ध पडल्याचं समजताच तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या यशस्वीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.या दुर्दैवी घटनेमुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. शाळेला सुरुवात होऊन अवघ्या तिसऱ्याच दिवशी विद्यार्थीनीचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.





