Bhandara District Bank Election : भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठा राजकीय धक्का पाहायला मिळाला आहे. २१ पैकी १५ जागांचा निकाल जाहीर झाला असून, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या परिवर्तन पॅनलला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सहकार पॅनलने ११ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. उर्वरित सहा जागांचा निकाल न्यायालयीन खटल्यामुळे तूर्तास थांबला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका मतदाराच्या पात्रतेवरून दाखल याचिकेवर निवडणूक निकाल जाहीर करण्यास स्थगिती दिली आहे. उद्या (२९ जुलै) न्यायालयाचा अंतिम निर्णय येणार असून, त्यानंतर या सहा जागांचा निकाल समोर येईल. मात्र, सहकार पॅनलने आतापर्यंत ११ जागा जिंकल्याने त्यांचे बँकेवरील वर्चस्व निश्चित झाले आहे. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही निवडणूक गेल्या नऊ वर्षांनंतर झाली असून, यामुळे सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणे तापली होती. नाना पटोले यांच्या परिवर्तन पॅनलला काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या भंडारा जिल्ह्यात अपेक्षित यश मिळाले नाही. याउलट, प्रफुल पटेल यांच्या सहकार पॅनलने मजबूत पकड दाखवत बँकेच्या संचालक मंडळावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निकालामुळे भंडारा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाला बळ मिळाले असून, काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आगामी काळात या निवडणुकीचे राजकीय परिणाम आणि सहकार क्षेत्रावरील प्रभाव याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.