पिंपरी | भक्तीची शिक्षणाबरोबर शेतीवरही ‘भक्ती’

सोमाटणे, (वार्ताहर) – शिक्षण घेतले तरी आपल्याला वारसाहक्काने काही गोष्टी मिळाल्या असून त्यातील एक म्हणजे शेती आहे. प्रत्येकाने शेती जपली पाहिजे, प्रत्येकाला शेती करता आली पाहिजे. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे साळूंब्रे गावातील भक्ती दिलीप राक्षे ही आहे.
भक्ती राक्षे ही अवघ्या १५ वर्ष वयात ती शेतातील कुळवापासुन ते बैलगाडी चालवण्यापर्यंतची सर्व कामे अत्यंत शिताफीने करते आहे. घरची आर्थिक परिस्थितीत अत्यंत चांगली असूनही तिला शेती आणि बैले यांची आवड आहे. शाळेत जाताना किंवा शाळेतून आल्यावर ती थोडा वेळ का होईना जनावरांच्या गोठ्यात विसावते.
काही बैल मारके असतात. घरातील ठराविक व्यक्तींनाच ते जवळ येवू देतात, परंतु भक्ती या सर्वांना अपवाद ठरली आहे. बैल मारके असले तरी चारापाणी देताना ते तिच्यावर धावत सुद्धा नाहीत. यावरून तिचे त्यांच्याशी किती घनिष्ठ नाते निर्माण झाले असावे याचा अंदाज येतो.
आठवीच्या वर्गात शिक्षण घेणारी भक्ती ही अभ्यासातही अतिशय हुशार आहे, असे तिचे दुग्ध उद्योजक वडील दिलीप राक्षे सांगतात. सोमाटणे येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारी भक्ती शिक्षणाबरोबर शेतीचीही भक्ती करते आहे. भक्ती लहान असल्यापासून शेतीची कामे करण्यासाठी प्रयत्न करायची.
यातूनच तिला शेतीची आणि बैलगाडीची आवड निर्माण झाली. आता सध्या ती औत चालवणे, बैलगाडी जुंपणे, कुळव चालवणे, बैलांना पाणी पाजणे, गायींची धार काढणे, अशी कामे करते. विशेष म्हणजे ही कामे करताना तिला आनंदही होतो. भक्ती या सर्व कामात पारंगत झाली आहे.
मला अभ्यास करायला जेवढा आवडतो तेवढीच शेतीची कामे करायला आवडतात. कदाचित याच आवडीतून मला ही कामे चांगले जमायला लागली आहेत. शिक्षणाबरोबर मुली शेतीही चांगल्या पद्धतीने करतात. मुली कोणत्याच क्षेत्रात मुलांपेक्षा कमी नाहीत.- भक्ती दिलीप राक्षे (सिंगल फोटो)





