मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भैय्याजी जोशीदेखील चिल्लर माणूस असल्याचे जाहीर करावे, नाहीतर त्यांच्यावर राजद्रोहचा गुन्हा दाखल करावा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ते आज (दि. ६) पत्रकारांशी बोलत होते. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्यावर करवाई करण्याची मागणी विधान परिषदेत विरोधकांनी केली होती. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकर हा चिल्लर माणूस आहे, असे म्हटले होते. त्यावर आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, या लोकांनी हिंदू- मुस्लिम असा वाद काढला नाही, तर आता मराठी- मराठी असा वाद काढलेला आहे. भैय्याजी जोशी घाटकोपरमध्ये येऊन काल बरळून गेले. त्यांना त्यांना मी आव्हान करतो की, अशी गोष्ट कर्नाटक, तामिळनाडू, बंगालमध्ये जाऊन बोलून दाखवा, अशी भाषा केल्यानंतर तेथून सुखरूप परत येऊन दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी केले. अनाजी पंत याही काळात जन्माला आले पुढे बोलताना म्हणाले, सगळे लोक छावा चित्रपटाला बघायला गेले नव्हते. काही अनाजी पंतही गेलेले नाहीत. अनाजी पंत याही काळात जन्माला आलेले आहेत. जसे काय आम्हीच सगळ्यांना ब्रह्मज्ञान शिकवले आहे, असा भास करून काही लोक वावरत आहेत, असा टोला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लगावला. तसेच भाजपला उत्तर विरुद्ध दक्षिण अशी देशाची विभागणी करायची आहे. भाजपला इंडिया नाहीतर हिंदीया करायचा आहे, असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर जोशीवर कारवाई केली पाहिजे भाजपमध्ये असलेल्या सगळ्या लोकांना जर मराठी भाषेबद्दल काही वाटत असेल, तर जोशी यांच्यावर कारवाई केली पाहिजे. अन्यथा हा संघाचा छुपा अजेंडा असल्याचा स्पष्ट होईल. भाजपची आणि संघाची अशी प्रवृत्ती आहे की, त्या ठिकाणी पिल्लू सोडायचं आणि पिल्लू मोठे झाले की खांद्यावरती घ्यायचे, अशी टीका उद्धव टाकरे यांनी यावेळी केली. भैय्याजी जोशी आले आणि गोमुत्र शिंपडून गेले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आता पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत. मात्र, महाराष्ट्रात, मराठी माणसात फूट पाडणारे औरंगजेब व त्यांना मदत करणारे अण्णाजी पंत या जमान्यातही जन्माला येत आहेत यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं. काही लोक असे आहेत जे आम्हीच ब्रह्मदेवाला जन्म दिला अशा आवेशात फिरत असतात व जगाला ब्रह्मज्ञान शिकवत फिरत असतात. ते भैय्याजी जोशी काल मुंबईत घाटकोपरला आले आणि गोमुत्र शिंपडून गेले, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.