ओझर : सांस्कृतिक गीतांच्या कार्यक्रमाने शिरोली बुद्रुक येथील भैरवनाथ यात्रेची सांगता

ओझर: शिरोली बुद्रुक ता. जुन्नर येथे सलग ३ दिवस चाललेल्या भैरवनाथ महाराज, जोगेश्वरी माता व दावलमालिक बाबा यात्रा उत्सवाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. सालाबाद प्रमाणे शिरोली बुद्रुक येथे भैरवनाथ यात्रेनिम्मित दि २२ ते २९ मार्च दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी निवृत्ती महाराज देशमुख यांचे तर सप्ताह कालखंडात ह. भ. प. सुदाम महाराज पानेगावकर, अमृताश्रम स्वामी महाराज विशाल महाराज खोले, प्रकाश महाराज जवंजाळ, तुकाराम महाराज मुंढे शास्त्री,अक्रूर महाराज साखरे, यांचे कीर्तन झाले. शनिवार दि. २९ मार्च रोजी ह. भ. प. समाधानजी महाराज शर्मा, बीड यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसाद वाटप होऊन सप्ताहाची सांगता झाली.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रविवार दि. ३० रोजी सकाळी ७ वा. भैरवनाथ महाराजांची महाआरती, अभिषेक व भराडाचा कार्यक्रम होऊन संध्याकाळी भिका भीमा सांगवीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी ३१ मार्च रोजी गाव बैठक होऊन सायंकाळी कुस्त्यांचा आखाड्याचा कार्यक्रम झाला. आखाड्याचे उद्घाटन विक्रम थोरवे यांनी तर सूत्रसंचालन गणेश राऊत यांनी केले.
पंच म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर देवणे, गुलाब थोरवे, वसंत शेरकर, प्रसाद थोरवे, पोलीस पाटील, अमोल थोरवे, जयसिंग थोरवे यांनी काम पाहिले. यावेळी वि. सह. सा. का. अध्यक्ष सत्यशील शेरकर, सरपंच प्रदीप थोरवे, नंदूशेठ शेरकर, अभिजित शेरकर, बाळासाहेब विधाटे, लक्ष्मण शेरकर, विष्णू थोरवे, मा. सरपंच नितीन थोरवे, दत्ता बोऱ्हाडे, योगेश हांडे, नितीन विधाटे, अॅड. संजय उकिर्डे, सदानंद थोरवे व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
मुलींच्या कुस्त्या हे या आखाड्याचे प्रमुख आकर्षण ठरले. याच दिवशी सायंकाळी ८ ते ११ या वेळेत गावच्या चौकात श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावरील छावा चित्रपट स्क्रीनवर दाखवण्यात आला. दि. १ एप्रिल रोजी दावल मालिक बाबा यात्रेच्या निमित्त सकाळच्या प्रहरात मांडव डहाळे मिरवणूक होऊन दावल मालिक बाबा डोंगरावर प्रसादाचे वाटप करण्यात आले. तर सायंकाळी ‘मराठी वादळ’ या सांस्कृतिक गीतांचा कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता झाली. यात्रेदरम्यांच्या काळात गावातील होतकरू तरुण संजय बोचरे, नितीन पंडित, देवा मिंडे, प्रवीण वाकचौरे,सागर थोरवे रणजित शेरकर यांनी वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन केले होते.





