जेजुरी : आरोग्य विश्वशांतीसाठी कुलदैवत खंडोबा गडावर दत्त परिवाराकडून भैरवचंडी यज्ञहवन संपन्न झाला. तीर्थक्षेत्र जेजुरी येथे रविवारी गुरुदेव दत्त भक्त परिवाराच्या वतीने आरोग्य विश्वशांतीसाठी भैरव चंडी यज्ञ हवन करण्यात आले. याप्रसंगी राज्याच्या विविध जिल्ह्यातून श्री गुरुदेव दत्त भक्ती परिवाराचे परमपूज्य गुरुवर्य अविनाश दादा बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो अनुयायी उपस्थित होते. रविवारी पहाटेपासूनच भूपाळी, आरतीनंतर राज्याच्या विविध जिल्ह्यातून भाविकांची सुट्टीनिमित्त जेजुरगडावर गर्दी झाली होती. यावेळी वैविध्यपूर्ण असे यज्ञ साहित्य द्वारा खंडोबा मंदिरावरील रंगमहालात होम हवन करण्यात आले होते. या होम हवनकरिता श्री मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, माजी विश्वस्त संदीप घोणे, माजी नगराध्यक्षा अमृता घोणे परिवारासह होम हवन यज्ञ विधीत सामील झाले होते. यावेळी शेकडो अनुयायांनी गुरुदेव दत्त आणि येळकोट येळकोट जय मल्हार याचा गजर केला. या यज्ञातील धार्मिक विधी परंपरेचा हजारो भक्तांनी लाभ घेतला “विश्वातील सध्याच्या परिस्थितीत आरोग्य समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्या. म्हणूनच कुलधर्म कुलाचाराच्या माध्यमातून आपल्या कुलस्वामिनीला आवाहन करत या यज्ञाचे आयोजन जागतिक विश्व आरोग्य शांतीसाठी आणि पर्यावरण संवर्धनाकरिता करण्यात आल्याची माहिती यावेळी दादाश्री बडगुजर यांनी दिली. यावेळी संदीप घुणे यांनी खंडोबा विषय विशेष माहिती दिली. खंडोबा देवाचे पुजारी महेश आगलावे आणि गणेश आगलावे यांनी या विधीत सहभाग घेतला. षष्ठीतील रविवार असल्याकारणाने मोठ्या प्रमाणावर ती भाविकांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवर्य दादा बडगुजर यांचे अनुयायी अभिरुची पारेख, पूनम राऊत, रूपाली आगलावे, प्रियंका कांचन, महेश आगलावे, निलेश तिवटे व वरद राऊत यांनी केले.