satara | भाईगिरी करणारी टोळी जेरबंद

सातारा, (प्रतिनिधी)- शहरातील सदरबझारमध्ये एका हॉटेल कामगाराला बेदम मारहाण करणाऱ्या पाच जणांच्या भाईगिरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, याप्रकरणी दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सौद अहमद खान (वय २१, रा. शाहूनगर, जगतापवाडी, सातारा), संकेत हिरालाल कदम (वय १९), लक्ष दीपक कदम (वय १९), आदित्य नारायण कांबळे (वय १९, रा तिघेही सदरबझार),
अभिजित श्रीधर सुर्यवंशी (वय १९, सध्या रा. गोळीबार मैदान, मूळ रा. मिल्ट्री अपशिंगे ता. सातारा) या संशयितांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मनोजसिंह भगवानसिंह राणा (वय २१, सध्या रा. सदरबझार, मूळ राज्य उत्तराखंड) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदरबझार येथे दि. १६ जून रोजी हॉटेलच्या कामावरुन घरी जात असणाऱ्या परप्रांतीय युवकास रस्त्यात अडवून संशयितांपैकी एकाने पाण्याची बाटली मागितली. त्यानुसार युवकाने बाटली दिली.
पाणी पिल्यानंतर बाटली परत मागितल्याने संशयितांनी त्याला दगडाने मारहाण करुन त्याचा मोबाइल चोरला. पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण विभागाला एका संशयिताचे नाव मिळाले. या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देऊन इतर संशयितांची नावे सांगितल्यावर त्यांना अटक करण्यात आली.
यावेळी पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व चार मोबाइल असा एकूण १ लाख ८0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुधीर मोरे, अविनाश गवळी, पोलीस निलेश यादव,
सुजीत भोसले, निलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने. सुशांत कदम, तुषार भोसले आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.
भाईगिरी करणाऱ्यांची माहिती द्या
सातारा शहर व परिसरातील तसेच उपनगरात रात्री उशिरापर्यंत टोळक्याने भाईगिरी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याशिवाय दिवसाही गल्लोगल्ली, चौकात, आडबाजूला थांबून टवाळखोर धतिंगगिरी करत असतात.
अशा हुल्लडबाजांची नावे व ठिकाण पोलिसांना कळवावीत. पोलीस त्यांच्यावर कठोर कारवाई करतील तसेच माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील, असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी केले आहे.





