छत्रपती संभाजीनगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात न्यायायलयाने दिलेल्या आदेशानंतर सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती एकत्र निवडणूक लढवणार आहेत. पण या निवडणुकीत भाजपाच मोठा भाऊ ठरणार असल्याचा दावा भाजपाचे राज्यसभा सदस्य व माजी मंत्री भागवत कराड यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग आणि राज्य सरकारने त्याकरिता पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी सुद्धा कंबर खोचली आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना खा. भागवत कराड म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यांच्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. भाजपा कार्यकर्त्यांची भावना आहे की, निवडणुका स्वबळावर लढल्या पाहिजेत. पक्ष सुद्धा स्वबळावर निवडणुका लढण्यासाठी तयार आहे. राज्यात महायुती अर्थात भारतीय जनता पक्ष, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती आहे. या महायुतीचे नेते वरिष्ठ पातळीवरती निवडणुका महायुतीमध्ये एकत्रित लढायच्या की स्वबळावर लढायच्या, याचा निर्णय लवकरच घेतील. मात्र कार्यकर्ते स्वबळासाठी आग्रही आहेत, अशी माहितीही कराड यांनी बोलताना दिली. निवडणुकीसाठी भाजप तयार संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे. त्याची तयारी भाजपाकडून केली जात आहे. त्यासाठी वार्ड आणि प्रभाग रचना केव्हा जाहीर होते, याची कार्यकर्ते वाट पाहात आहेत. मात्र ही निवडणूक महायुती म्हणून लढायची ? की स्वबळावर लढायची ? याचा निर्णय अद्याप झालेला नाही हा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून घेतील. पण संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये भाजपाच मोठा भाऊ ठरेल, असा विश्वासच खासदार कराड यांनी व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील, असा दावाही खासदार कराड यांच्याकडून करण्यात आला आहे.