नवी दिल्ली – गुजरातच्या शाळांमधील इयत्ता ६ वी ते ८ वीचे विद्यार्थीही श्रीमद भगवद गीता वाचतील. गीता जयंतीनिमित्त राज्याचे शिक्षण राज्यमंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी गुरुवारी गांधीनगरमध्ये या पुस्तकांचे लोकार्पण केले.
राज्याच्या शिक्षण विभागाने ही पुस्तके तयार केली आहेत. यामध्ये गीता मंत्र आणि त्यांचे गुजराती भाषांतर देखील समाविष्ट आहे. २०२४ च्या नवीन सत्रापासून या पुस्तकांचा अभ्यासक्रमात समावेश केला जाईल. त्याच बरोबर इतर विषयांप्रमाणे या विषयांचीही परीक्षा घेतली जाईल.
पुस्तकांच्या लोकार्पणप्रसंगी गीता जयंतीच्या शुभेच्छा देताना शिक्षणमंत्री पानशेरिया म्हणाले, विद्यार्थी गीतेचा धडा वाचतील आणि अडचणींना न जुमानता जीवनात उच्च ध्येय गाठतील, याचा मला आनंद आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना विश्वापासून पर्यावरणापर्यंत सर्व गोष्टींबद्दल भगवान श्रीकृष्णाने दिलेली शिकवण जाणून घेता येणार आहे. गीतेचे ज्ञान जीवन जगण्यासाठी आहे, जे सर्वांना उपयोगी पडेल. मग तो डॉक्टर असो वा इंजिनियर, व्यापारी असो वा वकील असो की राजकारणी. गीतेद्वारेच राष्ट्र उभारणी शक्य आहे, असेही यावेळी त्यांनी म्हटले आहे.
तसेच शिक्षणमंत्री पुढे म्हणाले की, आजचा दिवस शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा आहे. पाच हजार वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रात सांगितल्याप्रमाणे गीतेची तत्त्वे या पुस्तकांमध्ये आहेत. आज संपूर्ण जग ही तत्त्वे स्वीकारत आहे. हा कोर्स खूप चांगला आहे. ही पुस्तके तयार करण्यासाठी माझ्या विभागीय मित्रांच्या मेहनतीला मी सलाम करतो, असेही ते म्हणाले.
आत्महत्यांच्या घटनांमध्ये घट होईल
गीतेचा अभ्यासक्रमात समावेश केल्यामुळे विद्यार्थ्यांमधील नैराश्य कमी होईल आणि आत्महत्येच्या घटनाही कमी होतील.
नैराश्याचा पहिला बळी अर्जुन होता, त्याला गीतेचे ज्ञान देऊन डिप्रेशनमधून बाहेर काढले. गीता हे जीवनाचे संगीत आहे. मला आशा आहे की, आगामी काळात सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा टप्प्याटप्प्याने होईल.