उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई पुणे – शहरात शेकोटी पेटवण्याला बंदी करण्यात आली असून, या आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुल तसेच निवासी परिसरामध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षा कर्मचारी थंडीपासून बचाव करण्यासाठी उघड्यावर शेकोट्या पेटवतात. या शेकोट्यांमध्ये लाकूड, कचरा, कोळसा याशिवाय टायरही टाकतात आणि जाळतात. यामधून निर्माण होणाऱ्या धुरांमुळे मोठ्याप्रमाणात हवेत प्रदूषण होते आणि ही गोष्ट मोठ्याप्रमाणात शहरात वाढत आहे. हवा प्रदूषणामुळे न केवळ वातावरणामध्ये बदल होतात, तर त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरदेखील होतो. शेकोट्या पेटवण्यामुळे धूर, कार्बन मोनोऑक्साइड पीएम १०, पीएम २.५ आणि अन्य हानिकारक वायूंचे उत्सर्जन होऊन श्वसनावर परिणाम होतो, ज्यामुळे दमा, अस्थमा आणि इतर श्वसन रोगांचा धोका वाढत आहे. शहरातील हवा गुणवत्तेत सुधारणा करणेसाठी केंद्र तसेच राज्य सरकारने हवा प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी विविध कायदे आणि नियम बनवले आहेत. त्यानुसार उघड्यावर कोळसा, जैविक पदार्थ, प्लास्टिक, रबर आणि इतर कचरा जाळण्याला मनाई केली आहे. त्यामुळे जर पुणे शहरातील सोसायटीच्या परिसरात किंवा रस्त्यावर शेकोटी पेटवून उघड्यावर कोळसा अथवा जैविक पदार्थ, प्लॅस्टिक रबर आणि इतर कचरा जाळून धूर निर्माण केला आणि कोणत्याही गृहनिर्माण संकुलातील वॉचमन, सफाई कामगार आणि इतर कामगार व्यक्ती, मनपा कर्मचारी किंवा कंत्राटी कामगार किंवा मनपा ठेकेदाराकडील नियुक्त कंत्राटी कामगार या नियमांचे उलंघन करताना आढळल्यास, त्यांच्यावर पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.