बेशिस्त वाहन चालकांनो सावधान… !

पिंपरी – नो-पार्किंगमधील तसेच रहदारीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर आता कारवाई करण्यात सुरुवात केली आहे. कारवाईसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने वाहतूक पोलिसांना वाहने पुरविली आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांनो सावधान… तुमच्या वाहनांची आता उचलबांगडी होऊ शकते. यामुळे नियमांचा भंग केला म्हणून दंड आणि क्रेन किंवा टेम्पोचे भाडेही द्यावे लागणार आहे.
वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठिकठिकाणी नो-पार्किंग केली आहे. त्यासाठी ठिकठिकाणी बोर्डही लावले आहेत. तर काही ठिकाणी पे ऍन्ड पार्क केले आहे. मात्र काही नागरिक मनमानी पद्धतीने वाहने उभी करतात. अशा वाहनांचा रहदारीला अडथळा होतो. अशावेळी वाहतूक पोलीस संबंधित वाहनाचा फोटो काढून त्या वाहनाला आर्थिक दंडही करतात.
मात्र काहीजण या दंडालाही जुमानात नाहीत. वारंवार रहदारीला अडथळा होईल अशाच पद्धतीने वाहने पार्क करतात. अशा बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने दुचाकी वाहनांसाठी टेम्पो आणि चारचाकी वाहनांसाठी क्रेन वाहतूक पोलिसांना उपलब्ध करून दिली आहे.





