नवी दिल्ली : केंद्रिय गृह मंत्रालयाने नागरिकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाढत असलेल्या बनावट जाहिरातींबद्दल सावध केले आहे. या जाहिरातींचा उपयोग फसव्या गुंतवणूक योजना, बनावट नोकरीच्या संधी आणि ऑनलाइन घोटाळे करण्यासाठी केला जात आहे. अनेकदा वापरकर्त्यांना दिशाभूल करण्यासाठी डीपफेक व्हिडिओंचा वापर केला जातो. या घोटाळ्यांमुळे देशभरातील पीडितांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यापैकी अनेकजण आकर्षक दृश्ये, खोटी आश्वासने आणि व्यावसायिक दिसणाऱ्या ऑनलाइन पेजेसमुळे फसवले गेले आहेत. अहमदाबादमधील ट्रेडिंग घोटाळा अहमदाबादमधील एका २५ वर्षीय वैद्यकीय प्रतिनिधीला इन्स्टाग्राम जाहिरातीपासून सुरू झालेल्या ट्रेडिंग घोटाळ्यात ४४ लाख रुपये गमवावे लागले. उच्च परताव्याच्या आश्वासनाने आकर्षित होऊन, आर्थिक सल्लागार असल्याचा आव आणणाऱ्या फसव्या लोकांनी चालवलेल्या एका टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील झाला. आत्मविश्वास वाढवण्यासाठी या ग्रुपने सुरुवातीला स्क्रीनवर नफा वाढत असल्याचे दाखवले. परंतु नंतर वैद्यकीय प्रतिनिधीची संपूर्ण गुंतवणूक अचानक गायब झाली. अशोक विहार येथील महिलेची फसवणूक अशोक विहार येथील एका ४० वर्षीय महिलेला आलेल्या फसव्या स्टॉक ट्रेडिंग जाहिरातीमुळे २१ लाख रुपये गमवावे लागले. तिने एका कायदेशीर ब्रोकरेज प्लॅटफॉर्मसारखे दिसणारे मोबाइल ॲप्लिकेशन डाउनलोड केले. सुरुवातीला तिच्या खात्यात छोटे नफे दिसू लागले. त्यानंतर तिला शंभरहून अधिक सदस्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडले गेले. तिथे एका महिलेने तज्ज्ञ म्हणून गुंतवणुकीबद्दल मार्गदर्शन केले. तिने पंजाब, बंगाल आणि ओडिशातील तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित केले. जेव्हा तिने पुढील ७० लाख रुपये गुंतवण्यास नकार दिला, तेव्हा तिला ब्लॉक करण्यात आले. निवृत्त शिक्षकाची फसवणूक ईस्ट दिल्लीतील ७७ वर्षीय इंग्रजी शिक्षकाला पोलीस अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आल्यानंतर १३ लाख रुपये गमवावे लागले. फोन करणाऱ्याने त्यांचा नंबर मनी लाँड्रिंगशी जोडलेला असल्याचा आरोप केला आणि कॉल सीबीआय अधिकारी असल्याचा आव आणणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केला. आपले घर जप्त केले जाईल, अशा धमक्यांनी घाबरून, त्या वृद्ध व्यक्तीने पडताळणीसाठी व्हॉट्सॲपवर आपले बँक तपशील सामायिक करण्याच्या सूचनांचे पालन केले. कॅशबॅक घोटाळा रोहिणी येथील पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थीनीला बनावट कॅशबॅक योजनेत १.४ लाखाहून अधिक नुकसान झाले. क्यूआर कोडद्वारे कमिशनच्या आश्वासनाने ती आकर्षित झाली आणि पूर्वी भरलेले पैसे परत मिळतील या आशेने तिने पैसे हस्तांतरित करणे सुरूच ठेवले. एका मित्राने तिला सावध केल्यानंतर, तिने सायबर फसवणुकीची तक्रार दाखल केली आणि तिचे खाते गोठवले. त्यामुळे तिला ४०,००० रुपये परत मिळाले. मात्र, उर्वरित रकमेचा माग काढण्यापूर्वीच ते अनेक बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर झाले होते. वर्क फ्रॉम होम घोटाळा कमला नगर येथे राहणाऱ्या बिहारमधील एका यूपीएससी इच्छुकाला हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना रेटिंग देण्याच्या अर्धवेळ कामाची ऑफर देणारा व्हॉट्सॲप संदेश मिळाल्यानंतर फसवणूक झाली. सुरुवातीला, लहान देयकांनी सत्यतेचा आभास निर्माण केला. नंतर, त्याला मोठ्या कमिशनचे आश्वासन देऊन उच्च मूल्याचे टास्क पूर्ण करण्यासाठी पैसे हस्तांतरित करण्यास राजी केले गेले. त्याने अनेक खात्यांमध्ये ९३,००० रुपये हस्तांतरित केले होते. काय काळजी घ्याल? १. कोणतीही संशयास्पद कृती नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (www.cybercrime.gov.in) द्वारे किंवा १९३० हेल्पलाइनवर कॉल करून त्वरित कळवावी २. बनावट जाहिराती, समाज माध्यमांचा गैरवापर, पैसे अनेक खात्यांमध्ये ट्रान्सफर ३. इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (I4सी) द्वारे धोक्यांवर लक्ष ठेवते ४. ऑनलाइन गुंतवणूक, कॅशबॅक ऑफर्स, अर्धवेळ नोकरीच्या संदेशांना प्रतिसाद नको ५. नागरिकांनी सतर्क रहावे आणि गोंधळ टाळावा ६. समाजमाध्यमांतील सायबरदोस्तचा वापर करावा