पुणे – गरजू व्यक्तींना मदत वाटप करताना दोनपेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास अथवा मदत वाटपाचे फोटो सोशल मीडियाद्वारे प्रसारित केल्यास अशा व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. करोना आणि लॉकडाउनमुळे अडकून पडलेले बांधकाम मजूर, हातावर पोट असलेला गरीब वर्ग, रस्त्यावरील भिक्षेकरी यांचे जेवण मिळत नसल्याने हाल होत आहे. शासनाच्या माध्यमातून त्यांना मदत दिली जात असली, तरी विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था हे स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन गरजू नागरिकांना मदत करत आहेत. मात्र, ही मदत करताना अनेक ठिकाणी गर्दी होण्याचे प्रकार घडले आहेत. त्याच बरोबर सोशल डिस्टन्सिंगही पाळले जात नाही. तसेच मदत करणारे अनेक जण सोशल मीडियामातून जाहिरातबाजी करतात, त्यामुळे करोना रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाय योजनांना हरताळ बसत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने मदत करणाऱ्याना जिल्हाधिकाऱ्यांनी काही नियम घालून दिले आहेत. त्यानुसार मदत वाटण्यासाठी तहसीलदार अथवा पोलिसांची परवानगी बंधनकारक आहे. तसेच मदत वाटप करताना दोनच व्यक्ती असाव्यात, त्या व्यतिरिक्त अन्य कुणीही त्याठिकाणी असू नये. केलेल्या मदतीचे फोटो सोशल मीडियावर टाकू नयेत, अन्यथा अशा व्यक्तींवर भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.