दापोडी परिसरात बेशिस्त पार्किंग

वाहतुकीस अडथळा; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

पिंपळे गुरव – दापोडी परिसरात वाढत्या बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. या अनधिकृत पार्किगमुळे सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. तरी वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी सर्वसामन्यांमधून होत आहे.

दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत आहे. तसेच वाहन चालविणाऱ्यांची संख्या देखील वाढलेली आहे. त्यामुळे साहजिकच रहदारी वाढत आहे. रस्त्यावरच लोक छोटी मोठी दुकाने थाटलेली आहेत. तसेच भाजीपाला विकणाऱ्यांच्या गाड्या देखील रस्त्यावरच उभारलेले असतात. भाजी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी आपल्या गाड्या रस्त्यावरच उभे करत असल्यामुळे याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

तसेच दापोडीतील बुद्ध विहार, स्मशानभूमी, वि. भा पाटील पूल पुल हा दापोडी, पिंपळे गुरव, सांगवी, खडकी अशा अनेक मार्गांना जोडलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ असते. या ठिकाणच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्या पार्किंग करतात. मुळात हा रस्ता फार मोठा नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेशिस्त पार्किंगमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्यावर दोन्ही बाजूला ट्रक, टेम्पो ही वाहने उभी असतात. रात्रंदिवस ही वाहने येथेच उभी असतात. या मार्गावर जर बस आली तर अनधिकृत पार्किंगमुळे अडचण निर्माण होते. या बेशिस्त पार्किंग मुळे मोठा अपघात होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नाही तर वाहतुकीचे नियम तोडले म्हणून वाहतूक पोलीस त्यांच्याकडून दंड वसूल करतात. परंतु गेल्या अनेक दिवसापासून येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. याकडे ते दुर्लक्ष करतात तरी लवकरात लवकर वाहतूक पोलिसांनी येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

येथे रस्त्याच्या बाजूला उभारलेल्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून या अनधिकृत पार्किंगमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर वाहतूक विभागाने कायदेशीर कारवाई करावी.

– रोहित काटे, नगरसेवक

दापोडी परिसरातील रस्त्यावर बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवर यापूर्वी कारवाई केलेली आहे. तरी देखील या ठिकाणी बिनधास्तपणे वाहने उभी करतात. याची दखल घेऊन त्यांच्या कारवाई करण्यात येईल.

– अरूण ओंबासे, पोलीस निरीक्षक

Leave A Reply

Your email address will not be published.