Ultimate Kho Kho 2022 : मुंबई खिलाडीजला जॉन्टी ऱ्होड्सने दिले डायव्हिंगचे धडे

पुणे – विश्वकरंडक 1992 क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध जॉन्टी ऱ्होड्सने हवेत झेप घेत केलेला अफलातून धावबाद क्रिकेट शौकिनांच्या कायमच स्मरणात राहील. क्रिकेटमधील सार्वकालिक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक अशी कीर्ती मिळवणाऱ्या जॉन्टी ऱ्होड्सने अल्टीमेट खो खो लीग स्पर्धेतील पुनीत बालन, जान्हवी धारिवाल-बालन व बादशहा यांच्या मालकीच्या मुंबई खिलाडीज संघाच्या खेळाडूंना डायव्हिंगचे धडे दिले.
सध्याच्या सुरू असलेल्या अल्टीमेट खो खो लीग स्पर्धेत स्काय डाईव्ह आणि पोल डाईव्ह ही दोन कौशल्ये अत्यंत निर्णायक ठरत आहेत. जॉन्टी ऱ्होड्सने खेळाडूंशी संवाद साधताना या दोन कौशल्यांबाबत त्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.
माझी संपूर्ण कारकीर्द हवेत झेप घेतच गेली त्यामुळे त्यासाठी काय करायला हवे मला नीट माहीत आहे असे सांगून जॉन्टी ऱ्होड्स म्हणाले की, तुम्ही सूर मारताना स्वतःला पूर्ण झोकून दिले नाही तर दुखापत निश्चित ठरते. मला माझ्या कारकिर्दीत सूर मारण्यासाठी पोलचा आधार मिळत नव्हता. त्यामुळे मला हवेतच झेप घ्यावी लागत होती. पण प्रत्येकाला ते साध्य होत नाही. एका जागेवर उभे असताना झेल घेणे सोपे असते; परंतु सूर मारून झेल घेणे हे वेगळेच कौशल्य असते. मी तरुण असताना मीसुद्धा खो खो खेळलो आहे; परंतु त्यावेळेला इतके नियम नव्हते. तुम्ही खेळ आमूलाग्र बदलून टाकला आहे. विजय मिळवणे महत्त्वाचे असते; परंतु ते अंतिम ध्येय नव्हे. आजूबाजूच्या इतरांनाही प्रेरणा देणे तितकेच महत्त्वाचे असते.
यावेळी बोलताना मुंबई खिलाडीज संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर श्री म्हणाले की, एका सर्वोत्तम खेळाडूंकडून डायव्हिंगचे धडे शिकायला मिळणे हे या खेळाडूंसाठी भाग्याचेच आहे. डायव्हिंग हा खो खोचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून जॉन्टी ऱ्होड्ससारख्या महान खेळाडूकडून त्यासंबंधी बहुमोल मार्गदर्शन मिळणे या खेळाडूंवर दीर्घकालीन परिणाम करणारे ठरेल.





