कुर्ला बस अपघातातील जखमींचे सामान चोरणारा कॅमेऱ्यात कैद, गुन्हा दाखल

मुंबई – एक भरधाव बस मुंबईतल्या गजबजलेल्या परिसरात घुसली आणि 50 हून अधिक जणांना चिरडून एका सोसायटीच्या गेटवर आदळून थांबली. या अपघातानंतर संपूर्ण मुंबई हादरली. या घटनेत तब्बल 7 जण दगावले. कुणी आपली आई गमावली, तर कुणी आपल्या पोटची पोरं, कुणाचे वडील हिरावले गेले, तर कुणी भाऊ गमावला.
पण आता या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एक हेल्मेट घातलेला तरुण मृत महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सर्वांसमोर अगदी बिनधास्त हा तरुण मृत महिलेच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून घेत आहे.
दरम्यान, व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. हेल्मेट घातलेल्या युवकाने सर्वांसमोर मृत महिलेच्या बांगड्या चोरल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. ‘हाथ मे गोल्ड है’, असा स्पष्ट आवाज व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. डीसीपी गणेश गावडे यांनी माध्यमांना सांगितले की, हा व्हिडीओ आमच्या निदर्शनास आला आहे, आम्ही त्याची गांभीर्याने दखल घेतली असून आज आम्ही याप्रकरणी एफआयआर नोंदवून हे कृत्य कोणी केले याचा तपास करू.
असे आणखी कोणासोबत होऊ नये –
मृत कणीस फातिमा यांची मुलगी मेहरुनिशा यांनी सांगितलं की, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आम्ही पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यासोबत असे झालेय, दुसऱ्या कुणासोबत असे व्हायला नको. आम्हाला खूप दुःख झाले. माझी आई तिथे काय अवस्थेत होती. तिचा मृत्यू झालेला, तिचा मृतदेह होता आणि तो एक माणूस माझ्या आईच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढतोय. असा प्रसंग कुणावरच येऊ नये. माझे पोलिसांना एकच सांगणे आहे की, तुम्ही याच्यावर चांगली कारवाई करा. कोण होता? त्याने असे का केले? याची चौकशी करा, असेही त्या म्हणाल्या.


