Benjamin Netanyahu : परत मिळालेले अवशेष इस्रायली ओलिसांचे नाहीत; नेतान्याहू यांचा हमासवर आरोप

तेल अवीव : हमासकडून इस्रायलला परत मिळालेले मृतदेहांचे अवशेष हे पूर्वीच परत दिलेल्या इस्रायली ओलिसांच्या मृतदेहांचे अवशेष असल्याचा आरोप इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी केला आहे. नेतान्याहू यांनी नव्याने केलेल्या आरोपामुळे पुन्हा युद्धबंदी धोक्यात आल्याचे मानले जाते आहे. युद्धबंदीच्या करारानुसार हमासने इस्रायलच्या सर्व ओलिसांचे मृतदेह लवकरात लवकर इस्रायलला परत देणे अपेक्षित आहे.
हमासने ओलिसांच्या मृतदेहांचे सर्व अवशेष न दिल्यामुळे युद्धबंदीच्या तरतूदींचे उल्लंघन झाल्याचे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. हमासच्या कृतीला तातडीने प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बैठक देखील बोलावली आहे. हमासच्या कृतीला प्रत्युत्तर म्हणून गाझामध्ये जाणाऱ्या मानवतावादी मदतीला रोखले जाऊ शकते आणि गाझामधील इस्रायचे नियंत्रण वाढवले जाऊ शकते, असा अंदाज इस्रायली माध्यमांनी वर्तवला आहे. गाझामध्ये अजूनही १३ ओलिसांचे मृतदेह आहेत आणि त्या मृतदेहांचे अवशेष संथ गतीने परत मिळत आहेत.
ते त्या त्यामुळे युद्धबंदीच्या पुढील टप्प्यांची अंमलबजावणी धोक्यात येते आहे. सोमवारी, गाझा शहरातील देईर अल-बलाहमध्ये ४१ अज्ञात मृतदेह दफन करण्यात आले. हमासच्या ताब्यात असताना मारल्या गेलेल्या आणि या महिन्याच्या सुरुवातीला परत मिळालेल्या ओलिस योसी शराबीच्या मृतदेहावर इस्रायलमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान इस्रायलने व्यापलेल्या वेस्ट बँकच्या उत्तरेकडील भागात एका कारवाईदरम्यान तीन पॅलेस्टिनी अतिरेक्यांना ठार मारले आहे, असे मंगळवारी सकाळी इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले.
कबर 3 वेळा खणावी लागली
हमासकडून रात्री परत आणलेले अवशेष ओफिर त्झरफती यांचे असल्याचे ओळखले गेले आहे, दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी नोव्हा संगीत महोत्सवातून त्झरफतीचे अपहरण करण्यात आले होते. त्झरफती यांना बंदिवासात मारण्यात आले आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये इस्रायली सैन्याने त्यांचा मृतदेह परत मिळवला. मार्च २०२४ मध्ये, त्याच्या कुटुंबाला दफनविधीसाठी आणखी काही अवशेष मिळाले. ओफिरची कबर उघडण्याची आणि आमच्या मुलाला पुन्हा दफन करण्याची ही तिसरी वेळ आहे, असे त्झरफतीच्या कुटुंबाने एका निवेदनात म्हटले आहे.



