हमासच्या नेतृत्वाची गाझामधून हकालपट्टी होऊ शकते ! बेन्जामिन नेतान्याहू यांनी वर्तवली शक्यता

नवी दिल्ली – गाझामध्ये दडून बसलेल्या हमासच्या नेत्यांची गाझामधील नागरिकांकडूनच हकालपट्टी केली जाऊ शकते, असे इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे. हमासने अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांच्या नातेवाईकांशी बोलत असताना त्यांनी ही शक्यता वर्तवली आहे.
हमासच्या नेत्यांची हकालपट्टी केली जाण्याची चर्चा सुरू आहे. यामध्ये गाझाचा शासक याह्या सिनवार आणि इझ अद दिन अल कासम ब्रिगेडचे प्रमुख मुहम्मद देईफ यांचा समावेश असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
गाझामधून हमासच्या नेत्यांच्या हकालपट्टीबाबतची योजना तयार केली जाते आहे. इस्रायलकडून लवकरच या योजनेचा तपशील जाहीर केला जाण्याची वेळ जवळ आली आहे, असेही ते म्हणाले.
लेबनानमध्ये हवाई हल्ल्यात हमासचा उपनेता सालेह अल अरौरी याचा मृत्यू झाल्याचेही या बैठकीच्यावेळी सांगण्यात आले. बैरुतमध्ये एका स्फोटात तो ठार झाला. यामुळे या युद्धाची व्याप्ती गाझाबाहेर प्रादेशिक भूभागामध्ये वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
लेबनानमध्ये घुसून इस्रायलने हमासच्या म्होरक्याला ठार केल्याबद्दल लेबनानने इस्रायलवर जोरदार टीका केली आहे. हमास आणि इस्रायल दरम्यानच्या युद्धात लेबनानला खेचण्याचा प्रयत्न इस्रायल करत असल्याची टीका लेबनानच्या पंतप्रधानांनी केली आहे.
कोण होता सालेह अल-अरौरी?
हमासच्या पॉलिटब्युरोचा उपप्रमुख सालेह अल-अरौरी हा वेस्ट बँकमधील सशस्त्र शाखेमागील सूत्रधार म्हणून ओळखला जात होता. इस्रायलने १९९२ मध्ये सालेह अरोरीला अटक करून १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. २००७ मध्ये त्याची सुटका करण्यात आली. मात्र आणखी तीन वर्षे नजरकैदेत ठेवण्यात आले आणि २०१० मध्ये त्याला हद्दपार करण्यात आले.





