बेंगलुरूस्थित दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकेचे कॉसमॉस बँकेमध्ये विलीनीकरण

बेंगलुरू: बेंगलुरूस्थित दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व १३ शाखा रिझर्व्ह बँकेच्या मंजूरीने कॉसमॉस बँकेच्या शाखा म्हणून आज सोमवार (दि. ६ जानेवारी २०२५) पासून ग्राहक सेवेत रूजू होत आहेत. कॉसमॉस बँकेच्या सर्व अत्याधुनिक सेवा सुविधा आता या बँकेच्या ग्राहकांना मिळणार असल्याची माहिती बँकेचे सीए मिलिंद काळे यांनी दिली. (Bengaluru-based The National Cooperative Bank merged with Cosmos Bank)
“नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या एकूण १३ शाखा असून, १२ शाखा बेंगलुरूमध्ये व १ शाखा म्हैसूर येथे आहे. तसेच नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकेचा व्यवसाय डिसेंबर २०२४ अखेर रू. १,३२६ कोटी आहे. सदर विलीनीकरणामुळे ठेवीदारांच्या जवळपास रू. ७९२ कोटींच्या ठेवींना संरक्षण मिळाले आहे. बेंगलुरू स्थित या बँकेच्या विलीनीकरणामुळे कॉसमॉस बँकेचा विस्तार कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणात होत आहे (कर्नाटकमध्ये एकूण १७ शाखा). कॉसमॉस बँकेने पूर्वाश्रमीच्या नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व सेवकांनाही आपल्यात सामावून घेतले आहे.
सीए काळे पुढे म्हणाले की, कॉसमॉस बँक व नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या या ऐच्छिक विलीनीकरणामुळे आमच्या बँकेत आत्तापर्यंत एकूण १९ लहान बँका विलीन झाल्या आहेत. लाखो ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण यामुळे झाले आहे. कॉसमॉस बँकेचा आर्थिक पाया भक्कम असून मार्च २०२४ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेने रू. ३५४०० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. तसेच रू. ३५० कोटींहून अधिक नफा झाला आहे. बँकेचे भाग भांडवल व स्वनिधी रू.२००० कोटींच्यापेक्षा जास्त आहे. कॉसमॉस बँकेच्या आता सात राज्यात १८३ शाखा झाल्या आहेत.
तीव्र बँकिंग स्पर्धेमुळे लहान सहकारी बँकांना कामकाज करणे अवघड होऊन बसले आहे. कॉसमॉस बँकेने अशावेळी सहकाराचे तत्व जपत अनेक बँकांना सहकार्य केले आहे. यामुळे सहकारी बँकांमध्ये ठेवीदार सुरक्षित असल्याची शाश्वती दिली आहे. बँकेचे अध्यक्ष अॅड. प्रल्हाद कोकरे आणि उपाध्यक्ष सीए यशवंत कासार, संचालक मंडळातील इतर सदस्य व व्यवस्थापकीय संचालिका सौ. अपेक्षिता ठिपसे यावेळी उपस्थित होते.





