#PKLSeason10 (#BENvCHE Match 16) : बंगाल वॉरिअर्सचा मोठा विजय….

बंगळुरू – बंगाल वॉरिअर्सने प्रो-कबड्डी लीगमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात तमिळ थलैवाजचा ४८ विरुद्ध ३८ असा दहा गुणांनी पराभव केला. या लढतीत बंगालच्या मनींदर सिंगने १६ तर शुभम शिंदेने ११ गुण मिळवत विजयात मोलाचा वाटा उचलला.
या सामन्याला प्रारंभ झाला तेव्हा तमिळ संघाने आघाडी घेतली होती. पहिल्या सत्रातही तेच २७-२१ असे आघाडीवर होते. मात्र, त्यानंतर त्यांच्यावर बंगाल संघाने वर्चस्व गाजवले. त्यांनी तब्बल २६ रेड गुण मिळवताना तमिळ संघाकडून मिळालेली पिछाडी भरून काढली. तसेच अव्वल पकडी करत तमिळ संघालाच दडपणाखाली ठेवले. त्यांच्या मनिंदर सिंगने दुसर्या सत्रात अफलातून पकडी केल्या. त्याने सर्वबादचेही गुण मिळवले. त्याला शुभम शिंदेने तोडीस तोडी साथ दिली. या जोडीने तमिळ संघाच्या आव्हानातील हवाच काढून टाकली.
बंगालने टॅकलचे १४ गुण पटकावताना सहा गुण सर्वबाद करत मिळवले. हाच या दोन संघातील फरक अखेरपर्यंत कायम राहिला. तमिळ संघाला चढाया देखील करता आल्या नाहीत. त्यांची सामन्यावरील पहिल्या सत्रात असलेली पकड दुसरे सत्र सुरु झाल्यावर ढीली पडली. तमिळ संघाच्या नरेंद्र होशियार व अजिंक्य पवार यांनी सुरेख खेळ केला मात्र, त्यांच्या अन्य खेळाडूंना चमक दाखवता आली नाही. या उलट पहिल्या सत्रात कमकुवत वाटत असलेल्या बंगाल संघाने दुसर्या सत्रात बाजी मारली व सामना तमिळ संघाच्या हातून काढून घेतला.
There’s something about 𝐁𝐞𝐧𝐠𝐚𝐥𝐮𝐫𝐮 and 𝐜𝐨𝐦𝐞𝐛𝐚𝐜𝐤𝐬 🤌
Bengal Warriors script a massive comeback against Tamil Thalaivas in #BENvCHE 🔥#ProKabaddi #PKL #PKLSeason10 #HarSaansMeinKabaddi #BengalWarriors #TamilThalaivas pic.twitter.com/1xxT3IpgPN
— ProKabaddi (@ProKabaddi) December 10, 2023
बंगालच्या नितीन कुमार व श्रीकांत जाधव यांनी अखेरच्या काही मिनिटांत जोरदार मुसंडी मारली. त्याच्या आक्रमक खेळाला तमिळ संघाकडे उत्तरच नव्हते. दहा गुणांची आघाडी जेव्हा बंगाल संघाने घेतली तेव्हाच तमिळ संघाने पराभव मान्य केल्याचे त्यांच्या देहबोलीतून दिसत होते. तमिळ संघाचे स्टार खेळाडू साहिल सिंग व नितीन सिंग यांनाही अपयश आल्यामुळेच त्यांचा पराभव झाला. बंगालच्या खेळाडूंनी या दोघांची सुरेख पकड करताना त्यांना संधीच दिली नाही.





