‘आधार’ देऊनही लाभार्थी झाले निराधार….? संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे अनुदान थकले!

नेवासा: हयातीचे दाखले, आधार क्रमांक, बैंक पासबुकच्या झेरॉक्स देऊन आधार सिडिंग केले तरी गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाही. हे रखडलेले अनुदान तातडीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवर जमा करावे, अशी मागणी निराधार लाभार्थ्यांनी शासनाचा आधार मिळावा म्हणून केली आहे.
राज्य सरकारने थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेद्वारे संजय गांधी निराधार योजनेसह विविध सामाजिक अर्थ सहाय्य योजनांचा लाभ देण्याचा निर्णय घेतला घेतला. त्यासाठी लाभार्थ्यांना हयातीचे दाखले, लाभार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र, आधार क्रमांक, बँक पासबुकच्या झेरॉक्स सादर करण्यास तहसिल कार्यालयामधील संजय गांधी निराधार योजना शाखेतून सांगण्यात आले. यापूर्वीच आधार लिंक असलेले बँक खाते आधार सिडिंग करून घेण्याच्या सूचना लाभार्थ्यांना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या विविध लाभार्थ्यांनी ही कागदपत्रे दोन-तीन महिण्यापुर्वीच जमा केली आहेत.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या लाभार्थ्यांचे अनुदान निराधारांच्या बँक खात्यात जमा होत नसल्यामुळे वयोवृद्ध लाभार्थी हवालदिल झाले आहेत. याबाबत संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार संदीप चिंतामण यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थ्यांचे अनुदान माहे डिसेंबर २०२४ पासून डीबीटी प्रणालीद्वारे या लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडून दिले जात आहे.
मात्र, सदर प्रणालीद्वारे ज्या लाभार्थ्यांचे आधारकार्ड क्रमांक त्यांच्या अनेक खात्यांपैकी कोणत्या खात्यावर गेले? हे प्रशासन काय सांगू शकत नाही? तर ते आधार केंद्रावर जाऊन आधार क्रमांकानुसार त्याचा शोध घेतल्यास कोणती बँकेत लाभार्थ्यांचे अनुदान जमा झाले ते कळू शकते. त्यामुळे आपण जर श्रावण बाळ, संजय गांधी योजनेचे लाभार्थी असाल, व आपल्या नेहमी अनुदान येणाऱ्या खात्यावर अनुदान जमा होत नसेल? तर आपण उरलेले सर्व बँक खात्याची खात्री करावी. अन्यथा तरीही आपणास लक्षात येत नसेल, तर आधार केंद्रावर जाऊन संबंधित बँकेची माहिती करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
तहसीलदारांचे आवाहन
या योजनेचे ८५ टक्के डीबीटीचे कामकाज पूर्ण झाले असून १५ टक्के अंदाजे ८०० लोकांचे काम या प्रणालीमध्ये समावेश करणे बाकी आहे. संबंधितांना पत्र पाठवून नेवासा तहसील कार्यालयात बोलावले जाणार आहे. त्या लाभार्थ्यांनी येताना आधारकार्ड व त्या बँकेला लिंक असलेला मोबाईल नंबर घेऊनच संजय गांधी निराधार योजनेच्या शाखेत संपर्क साधावा आणि डीबीटीबाबतची कार्यवाही पुर्ण करावी, असे आवाहनही नेवासा तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी प्रस्तृत प्रतिनिधींशी संवाद साधताना केले आहे.





