पुणे जिल्हा | लाडक्या बहिणींनी आमदार भरणेंना बांधल्या राख्या

इंदापूर, (प्रतिनिधी) – राज्य सरकारने सन्माननिधी खात्यावर जमा करताच आमदार तथा माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी तालुक्यातील असंख्य महिला एकत्र येत त्यांना राखी बांधत आनंदोत्सव साजरा केला.
त महाराष्ट्र शासनाने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून यामध्ये पात्र लाभार्थी महिलांना दीड हजार रुपये सन्माननिधी देण्याचा ऐतिहासिक निर्णय महिन्याभरापुर्वी घेतला होता. या योजनेचे इंदापूर तालुक्याचे पदसिद्ध अध्यक्ष आमदार दत्तात्रय आहेत.
त्यांनी गेल्या महिनाभरापासून या योजनेचा लाभ तालुक्यातील पात्र, गरजु महिलांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते.
यामध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणेला दिवस-रात्र कामाला लावुन या योजनेपासून एकही महिला वंचित राहणार नाही अशा प्रकारच्या सक्त सुचना आमदार भरणे यांनी केल्या होत्या.तसेच त्यांनी स्वतः प्रत्येक गावामध्ये जाऊन या योजनेचा प्रत्यक्ष आढावा घेत कागदोपत्री अडचणी सोडविण्यासाठी मेहनत घेतली होती.
त्याचीच फलश्रुती म्हणून इंदापूर तालुक्यातील हजारो महिलांच्या बँक खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्माननिधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.ऐन रक्षाबंधनाच्या पुर्वसंध्येला असंख्य महिलांच्या खात्यावर दोन महिन्यांचे मिळून सुमारे तीन हजार रूपये जमा झाल्याने महिलावर्गामध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.
त्यामुळे तालुक्यातील हजारो महिलांनी एकत्र येत आमदार भरणे यांना राखी बांधत आनंदोत्सव साजरा केला.
तुमचा लहान-मोठा भाऊ म्हणून नेहमीच तुम्हा सर्वांच्या पाठीमागे खंबीरपणे ऊभा राहणार आहे. ज्या भगिनींनी या योजनेचा अर्ज भरला नाही.
त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज भरून घ्यावेत.त्याचबरोबर ज्या भगिनींचे आधारकार्ड बँक खात्याला लिंक नाहीत, त्यांनी त्वरित बँकेत जाऊन आपले आधारकार्ड लिंक करून घ्यावे. – दत्तात्रय भरणे, आमदार





