बेल्हे -येथील परिसरात चक्रीवादळामुळे आंबे, डाळींब, केळी, टोमॅटो, जनावरांचा चारा, ऊस, पॉलिहाऊस, फळभाज्या व पालेभाज्या यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान शेतकरी वर्गाचे झाले आहे. बेल्हे येथील खोमणे मळ्यातील डॉ. मनोहर खोमणे यांचे दोन एकर केळींची बाग भुईसपाट झाली. तसेच डाळिंबाच्या पाच एकर बागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. डाळिंबांचा अक्षरशः सडाच खाली पडला होता. तसेच पपईच्या बागेचेही नुकसान झाले. तसेच बबन औटी यांची कांद्याची अरण पूर्णपणे भिजली तसेच त्यांचे आंब्याचेही नुकसान झाले. तसेच ऊसपीक जागेवरच झोपले. विश्वनाथ डावखर यांची एक एकर टोमॅटोची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. तसेच डाळिंबाच्या दोन एकर बागांचे व आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच जानकू डावखर यांचे तीन एकर डाळिंबाचे नुकसान झाले. भिवसेन विश्वासराव यांची कारल्याची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली त्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले. संतोष मटाले यांचे केळीचे नुकसान झाले. रमेश पिंगट यांच्या केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले. तसेच कांद्याचेही नुकसान झाले. भूपाल माडिवाले यांचेही केळीच्या बागेचे, जालिंदर डोंगरे यांच्या मक्याचे नुकसान झाले. तसेच अनेक घरांचे पत्रे व कौले उडून मोठे नुकसान झाले. शासनाने परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाचे पंचनामे तातडीने करून शेतकरी वर्गाला भरीव मदत करावी. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत. फळबाग व पॉलिहाऊस चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या नुकसानी लाखांत असल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. -अतुल भांबेरे, सामाजिक कार्यकर्ते जुन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या आंबे, केळी, पपई, डाळिंबचे नुकसान झाले आहे. गुरुवारपासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. -एस. के. शिरसाट, जुन्नर तालुका कृषी अधिकारी