Pune District : बेल्हे प्रादेशिक नळ योजनेला गळतीचे ग्रहण
Pune District : बेल्हे प्रादेशिक नळ योजना ही या गावांच्या पाणीपुरवठ्याचा महत्त्वाचा आधार आहे. मात्र, योजनेची जुनी पाइपलाइन वारंवार गळतीला सामोरी जात आहे. राजुरी येथे एका नागरिकाच्या घराचे बांधकाम सुरू असताना पाइपलाइन फुटल्याने योजनेतून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला.

बेल्हे : बेल्हे प्रादेशिक नळ योजनेची पाइपलाइन राजुरी येथे फुटल्याने बेल्हे, गुळुंचवाडी, गुंजाळवाडी आणि आणे या चार गावांचा पाणीपुरवठा गेल्या 12 ते 15 दिवसांपासून ठप्प झाला आहे. एकीकडे परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. पाइपलाइन फुटून अनेक दिवस उलटले, तरी पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्याने चारही गावांतील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बेल्हे प्रादेशिक नळ योजना ही या गावांच्या पाणीपुरवठ्याचा महत्त्वाचा आधार आहे. मात्र, योजनेची जुनी पाइपलाइन वारंवार गळतीला सामोरी जात आहे. राजुरी येथे एका नागरिकाच्या घराचे बांधकाम सुरू असताना पाइपलाइन फुटल्याने योजनेतून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. नवीन योजनेचे काम सुरू असले, तरी ते अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जुन्या पाइपलाइनवरील बिघाडाचा फटका चारही गावांना बसत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना पाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परिसरात पावसाअभावी दुष्काळसदृश स्थिती असल्याने विहिरी आणि अन्य जलस्रोतांवरही पाणीटंचाईचा परिणाम जाणवत आहे. अशा परिस्थितीत प्रादेशिक नळ योजनेचा पुरवठा बंद झाल्याने नागरिकांसमोरील संकट अधिकच गंभीर बनले आहे.
पाइपलाइनच्या दुरुस्तीला विलंब होत असल्याने पाणीपुरवठा नेमका कधी सुरू होणार, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. संबंधित यंत्रणेने तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, तसेच तोपर्यंत गरजेनुसार टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, आणे गावच्या सरपंचांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला असून, योजनेच्या ठेकेदारांनी निधी आणि पाइपच्या उपलब्धतेचा प्रश्न मांडला आहे.
आणे पठारावर दुष्काळाच्या झळा सहन करणार्या नागरिकांना नळाच्या पिण्याच्या पाण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात. अन्यथा तीव्र रस्तारोको आंदोलन व हंडा मोर्चा काढण्यात येईल.
-प्रियंका दाते, सरपंच, आणेबेल्हे नळ पाणीपुरवठा लवकरात लवकर दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना दिल्या आहेत. याबाबत जिल्हा परिषदेकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे. 12 ते 15 दिवसांत दुरुस्तीचे काम पूर्ण करून नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे.
-स्मिता पंकज कणसे, जिल्हा परिषद सदस्या, बेल्हे-राजुरी गटजुन्या योजनेच्या पाइपलाइनवर अनेक ठिकाणी बांधकामे झाल्याने वारंवार गळती होते. नवीन योजनेचे 75 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे; मात्र उर्वरित कामासाठी शासनाकडून सुमारे अडीच वर्षांपासून निधी मिळालेला नाही. सरकारी पुरवठ्यातील पाइपचाही तुटवडा आहे. पाइप उपलब्ध झाल्यास राजुरी येथे नवीन जोडणी तत्काळ केली जाईल. निधी आणि पाइप वितरणाबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होणे गरजेचे असून, आमदार शरद सोनवणे यांच्या माध्यमातून चर्चा सुरू आहे. लवकर निर्णय झाल्यास 10 ते 15 दिवसांत पाइपलाइनचे काम पूर्ण होऊ शकते.
-विवेक पानसरे, ठेकेदार, बेल्हे प्रादेशिक नळ योजना





