BEL, Metamind and Kristellar sign MoU: भारतीय संरक्षण क्षेत्रात ’आत्मनिर्भरता’ वाढवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने मेटामाइंड सिस्टीम्स आणि क्रिस्टेलर एरोस्पेस या कंपन्यांसोबत एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. सोमवारी झालेल्या या करारामुळे संरक्षण आणि गैर-संरक्षण विभागांत प्रगत तंत्रज्ञान विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या त्रिपक्षीय भागीदारीचा मुख्य भर सायबर सुरक्षा, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, एव्हियोनिक्स, सेमीकंडक्टर आणि डेटा सेंटर यांसारख्या भविष्य-सज्ज क्षेत्रांवर असेल. यामध्ये तिन्ही संस्थांच्या ताकदीचा उपयोग केला जाणार आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही उत्पादन क्षमता आणि जागतिक विपणन पोहोच असलेली कंपनी असून मेटामाइंड ही एआय-चालित डेटा विश्लेषण आणि प्रकल्प प्रशासन असलेली कंपनी आहे. प्रगत संशोधन आणि विकास, क्यूबसॅट सिस्टीम्समध्ये क्रिस्टेलर ही अग्रेसर असलेली कंपनी आहे. या कराराचा मुख्य उद्देश केंद्र सरकारच्या ’मेक इन इंडिया’ आणि ’आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला बळकट करणे हा आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करून केवळ भारताची गरज भागवणेच नव्हे, तर प्रगत संरक्षण प्रणालींची निर्यात क्षमता वाढवण्याचे ध्येय या कंपन्यांनी ठेवले आहे. याप्रसंगी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे अध्यक्ष मनोज जैन, मेटामाइंडचे सीएमडी हृषिकेश किणीकर आणि क्रिस्टेलरचे सीईओ उदय बानू दास यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हे सहकार्य स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी आणि जटिल प्रकल्पांमधील धोके कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.