बेंगळुरू : देशाची मूळ संस्कृती ही हिंदू आहे. हिंदू समाजाला सत्तेसाठी नव्हे, तर राष्ट्राला वैभवशाली बनवण्यासाठी संघटित करायचे आहे. संघाला सत्ता किंवा समाजात प्रतिष्ठा नको आहे. तो फक्त सेवा आणि समाजाला भारत मातेच्या वैभवासाठी संघटीत करू इच्छितो. तसेच हिंदू असण्याचा अर्थ भारतासाठी जबाबदार असणे असा असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष सुरू आहे. यानिमित्ताने बंगळुरू येथे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘100 वर्षांची संघ यात्रा: नवे क्षितिज’ या विषयावर व्याख्यान दिले. मोहन भागवत म्हणाले, भारतात कोणीही गैर-हिंदू नाही. कोणत्याही श्रद्धा असोत, भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू संस्कृतीशी जोडलेला आहे आणि त्यांचे पूर्वजदेखील हिंदू आहेत. संघ कधीही सत्तेची इच्छा करत नाही. तर हिंदू समुदायाला एकत्र आणण्यासाठी आणि भारतमातेचा गौरव वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. जेव्हा संघासारखी संघटित शक्ती उदयास येते तेव्हा ती सत्ता मिळवण्याची इच्छा ठेवत नाही. ती समाजात प्रमुखता शोधत नाही. ती फक्त भारतमातेच्या गौरवासाठी सेवा करते, समाजाचे संघटन करते. आपल्या देशातील लोकांना पूर्वी यावर विश्वास ठेवणे खूप कठीण वाटत होते. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही, असही भागवत यांनी नमुद केले. ब्रिटिशांनी आपल्याला एक राष्ट्र बनवले नाही, तर प्राचीन काळापासून भारत एक राष्ट्र आहे. सर्व देशांची एक संस्कृती आहे. त्याचप्रमाणे, भारताचीदेखील संस्कृती हिंदू आहे. आपण स्वतःला काहीही म्हणत असलो तरी आपली ओळख नेहमी हिंदू अशीच राहील. मुस्लिम असोत किंवा ख्रिश्चन, आपण सर्व एकाच संस्कृतीतून आलो आहोत, असे त्यांनी सांगितले.