ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या प्रमुख बेगम खालिदा झिया यांना ५ वेगवेगळ्या प्रकरणांमधून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. या ५ प्रकरणांमध्ये खोटा वाढदिवस साजरा करणे आणि युद्धगुन्हेगारांची मदत करण्याच्या आरोपांचाही समावेश आहे. ढाका अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी ४ प्रकरणातून तर अतिरिक्त मुख्य न्यायाधीशांनी एका प्रकरणात झिया यांची मुक्तता केली. फिर्यादी न्यायालयात हजर न राहिल्याने झिया यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. ऑग्स्ट २०१६ मध्ये खोटा वाढदिवस साजरा केल्याबद्दल एका पत्रकाराने झिया यांच्याविरोधात एक प्रकरण दाखल केले होते. झिया यांच्या ५ वेगवेगळ्या दिवशी जन्मदिनांक असल्याचे आपल्या पहाणीत आल्याचे या पत्रकाराने न्यायालयात सांगितले होते. यातील एक तारीखही १५ ऑगस्ट नव्हती. तरी देखील झिया या १५ ऑगस्ट रोजी आपला वाढदिवस साजरा करत असल्याचे या पत्रकाराने म्हटले होते. दिनांक १५ ऑगस्ट रोजीच बंगबंधू शेख मुजीबूर रेहमान यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची हत्या झाली होती. त्यामुळे १९९६ पासून हा दिवस बांगलादेशात राष्ट्रीय दुखवटा पाळला जातो. बंगबंधू आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेला मलीन करण्यासाठीच झिया आपला वाढदिवस १५ ऑगस्ट रोजी साजरा करत असल्याचा आरोप या पत्रकाराने केला होता. याशिवाय युद्धगुन्हेगारांना मदत करण्याचा आरोपही झिया यांच्यावर २०१६ च्या नोव्हेंबरमध्ये करण्यात आला होता. बंगबंधू आणि आवामी लीग पक्षाची निंदा केल्याबद्दल जानेवारी २०१७ मध्ये बदनामीचा एक खटलाही झिया यांच्याविरोधात दाखल झाला होता. डिसेंबर २०१६ मध्ये छात्र दलाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमातील भाषणामध्ये बोलताना बंगबंधूंना बंगालादेशचे स्वातंत्र्य नको होते, उलट त्यांना अविभाजीत पाकिस्तानचे पंतप्रधान व्हायचे होते, असा आरोप झिया यांनी केला होता. याशिवाय बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धादरम्यानच्या पीडीतांबद्दल अपशब्द उच्चारल्याबद्दल झिया आणि बीएनपीचे नेते गायेश्वर चंद्र रॉय यांच्याविरोधात एक प्रकरण दाखल झाले होते. २०१६ च्या नोव्हेंबरमध्ये बदनामी आणि हत्येची धमकी दिल्याबद्दल बांगलादेश जननेत्री परिषदेचे अध्यक्ष एबी सिद्दिकी यांनी झिया यांच्याविरोधात आणखी एक प्रकरण दाखल केले होते. गेल्या ५ वर्षांपासून स्थानबद्ध खालिदा झिया या गेल्या ५ वर्षांपासून स्थानबद्ध आहेत. गेल्या आठवड्यात अध्यक्षांनी शिक्षा माफ केल्यानंतर झिया यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आवामी लीग सरकार पडल्यानंतर त्यांच्याविरोधात असलेल्या सर्व प्रकरणांमधून त्यांची मुक्तता करण्यात आली आहे. झिया यांनी मार्च १९९१ ते मार्च १९९६ आणि पुन्हा जून २००१ ते ऑक्टोबर २००६ पर्यंत बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या.