नवी दिल्ली: देशाची राजधानी हादरवून सोडणारी एक भीषण घटना लक्ष्मीनगर भागातील सुभाष चौक येथे घडली आहे. आर्थिक विवंचनेतून एका २३ वर्षीय तरुणाने आपल्याच कुटुंबातील तीन सदस्यांची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, आरोपीने हत्या करण्यापूर्वी सर्वांना धतुऱ्याचे बीज मिसळलेले लाडू खाऊ घातले आणि ते बेशुद्ध झाल्यावर त्यांची गळा आवळून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी यशवीर सिंह (२३) हा गेल्या सहा महिन्यांपासून बेरोजगार होता. सोमवारी सकाळी तो यमुना बँक मेट्रो स्टेशन जवळील एका मंदिरात गेला. तिथून त्याने धतुऱ्याची फळे गोळा केली आणि घरी येऊन त्यातील बिया मिसळून लाडू तयार केले. हे लाडू त्याने आपली आई कविता (४६), बहीण मेघना (२४) आणि १४ वर्षीय लहान भाऊ मुकुल यांना खायला दिले. विषारी लाडू खाल्ल्यामुळे तिघेही बेशुद्ध झाले. त्यानंतर दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास यशवीरने एकामागून एक तिघांचाही गळा आवळून खून केला. स्वत:च पोलीस ठाण्यात झाला हजर थरकाप उडवणारी ही घटना घडवून आणल्यानंतर आरोपी यशवीरने पळून न जाता थेट लक्ष्मीनगर पोलीस ठाणे गाठले. सोमवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आणि आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. “मी माझ्या कुटुंबाला संपवले आहे,” असे त्याने सांगताच पोलीसही चक्रावून गेले. आर्थिक संकट आणि विम्याच्या रकमेचा अँगल? पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, यशवीरचे कुटुंब प्रचंड आर्थिक संकटात होते. त्याचे वडील ट्रक चालक असून ते गेल्या सहा महिन्यांपासून कुटुंबासोबत राहत नव्हते. यशवीर स्वत: चालक होता, मात्र गेल्या सहा महिन्यांपासून त्याचेही काम सुटले होते. तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे की, यशवीरने स्वतःच्या नावावर सुमारे १.५ कोटी रुपयांची जीवन विमा पॉलिसी घेतली होती. त्याने यापूर्वी आत्महत्येचेही अनेक अयशस्वी प्रयत्न केले होते. विम्याच्या पैशांसाठी किंवा नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलले का, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत पुरावे गोळा केले आहेत. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून शेजारी आणि नातेवाइकांची चौकशी सुरू केली आहे. १.५ कोटींच्या विमा पॉलिसीचा या हत्येशी काही संबंध आहे का, या दिशेनेही तपास पथके काम करत आहेत.