नवी दिल्ली – गॅंगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची प्रयागराजच्या कॅल्विन वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेर 15 एप्रिलच्यारात्री पोलीस बंदोबस्तात असताना अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खुलेआम हत्या केली. पोलीस या दोन्ही गॅंगस्टर भावांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते.
वाटेत माध्यमांशी हे दोन्ही गुन्हेगार बोलत असताना अचानक एकाने अतिकच्या थेट डोक्यात गोळी झाडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अशरफवर तिघांनी पिस्तुलीतून बेछूट गोळीबार केला. यात अतिक आणि अशरफ दोघेही ठार झाले. यानंतर तिन्ही आरोपींनी आत्मसमर्पण केले.
दरम्यान, आता हत्येतल्या प्रमुख आरोपींबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आपण पत्रकार आहोत, असं भासवत आरोपी घुसले आणि त्यांनी या दोघांची हत्या केली. या आरोपांनी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं असून तपासही सुरू केला आहे. लवलेश तिवारी, अरुण मौर्य आणि सनी सिंह असं मारेकऱ्यांचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अतिकच्या हत्येपूर्वी दिवसभर आरोपी माध्यम प्रतिनिधींसोबत फिरत होते, पोलिसांसोबत वावरत होते. एका स्थानिक वेबसाईटसाठी काम करणाऱ्या तिघांनी आरोपी तिवारीला पत्रकारितेबद्दलची माहिती दिली आणि त्याला कॅमेरा घ्यायला मदतही केली,
त्या तिघांना आता पोलिसांनी उत्तर प्रदेशातल्या बांदा रेल्वे स्टेशनवरुन ताब्यात घेतलं असून आणखी तपास अधिकारी करत आहेत. दरम्यान, या तिन्ही आरोपींनी 20 पेक्षा अधिक वेळा गोळ्या झाडल्यानंतर स्वतःला सरेंडर केलं.