Suresh Dhas : कराडवर मकोका लागताच सुरेश धस यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. वाल्मिक कराडच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. एसआयटीकडून देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आष्टीचे आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हणाले सुरेश धस?
वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर दोषींवर कारवाई होईल असा विश्वास सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणातील गुन्ह्यात वाल्मिक कराड हा आरोपी आहे की आणखी कोण आहे, हा मुद्दा नव्हता. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा होता. संतोष देशमुखच्या हत्येनंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. कोणताही दोषी सुटणार नाही अशी मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली होती असेही त्यांनी म्हटले.देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीने आता आपलं काम दाखवण्यास सुरुवात केली आहे. कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचा विश्वास सुरेश धस यांनी व्यक्त केला.
वाल्मिक कराड याची सीआयडी कोठडी आज संपली. त्यानंतर आज कोर्टासमोर त्याला हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी आणि कराडच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. आजच्या सुनावणीनंतर कोर्टाने खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली.
त्यामुळे वाल्मिक कराडला दिलासा मिळेल अशी शक्यता होती. मात्र, एसआयटीने कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असून कराडचा ताबा मागितला. त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता वाल्मिक कराडलाही आरोपी करण्यात येणार आहे.





