Beed Politics: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या, २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. महायुतीच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले असतानाच, दुसरीकडे खासदार बजरंग सोनवणे यांनी आमदार धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. बारामती पोटनिवडणुकीत करुणा शर्मा यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच मुद्द्यावरून बजरंग सोनवणे यांनी मुंडेंना लक्ष्य केले. “बाहेरचे हवशे-गवशे-नवशे बारामतीत पोहोचले आहेत, इतकेच नाही तर आमच्या बीडच्या ताईंनीही तिथे जाऊन निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज पतीराजाला विचारून भरल्याचे म्हटले आहे. पण ही नेमकी भानगड काय आहे? हेच आम्हाला कळत नाही,” अशा शब्दांत सोनवणेंनी मुंडेंना डिवचले. हेही वाचा – महाराष्ट्रात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी प्रत्येक पक्षाने सुनेत्रा पवारांना बिनशर्त पाठिंबा दिला असताना, ही निवडणूक नेमकी कुणाच्या खोडीमुळे होत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या पोटनिवडणुकीत करुणा शर्मा आणि अभिजीत बिचुकले यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास कधी? यावेळी बोलताना बजरंग सोनवणे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. या अपघाताचा तपास नेमका कुठे पोहोचला, त्याचा ‘ब्लॅक बॉक्स’ कुठे आहे, याबाबत अधिकृत किंवा अनधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही, असे ते म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्राला या प्रकरणाचे सत्य जाणून घ्यायची इच्छा आहे. मुख्यमंत्री प्रत्येक सभेत तपास सुरू असल्याचे सांगतात, त्यांचे त्याबद्दल कौतुक आहे; मात्र तपासाचे निष्कर्ष समोर येण्याचा तो दिवस नक्की कधी उजाडणार? असा खोचक सवालही सोनवणे यांनी याप्रसंगी उपस्थित केला.