Beed News : बीडमध्ये आंदोलक महिलेचा मृत्यू; उपोषण सुरू असतानाच घेतला अखेरचा श्वास

बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात अवादा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात शेतक-यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शेतकरीवर्गात संतापाची लाट पसरली आहे. केज तहसील कार्यालयासमोर शेतक-यांनी अवादा कंपनीच्या दडपशाहीविरोधात बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
मयत महिलेच्या शेतातून कंपनीने परवानगीशिवाय विजेच्या तारा ओढल्या होत्या, ज्यामुळे तिच्या शेतीचे नुकसान होत होते. या अन्यायाविरोधात तिने स्थानिक प्रशासनाकडे दाद मागितली. परंतु तहसीलदाराने हे प्रकरण आमच्या अखत्यारीत येत नाही, असे पत्र देऊन जबाबदारी झटकली. शेवटी, न्यायासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारताना आंदोलन करताना या महिलेने आंदोलनस्थळीच अखेरचा श्वास घेतला. यानंतर संतप्त आंदोलकांनी ‘जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि अवादा कंपनीवर कारवाई होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत मृतदेह आंदोलनस्थळी ठेवला आहे.
दरम्यान, या घटनेवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘केज तहसील कार्यालयासमोर अवादा कंपनीच्या मनमानीविरोधात उपोषण करणा-या महिलेचा मृत्यू ही अत्यंत गंभीर आणि दु:खद घटना आहे. कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या प्रकरणानंतर हा दुसरा राजकीय खून आहे. शेतक-यांच्या शेतातून अवादा कंपनीने परवानगीशिवाय तारा ओढल्या आणि प्रशासनाने दुर्लक्ष केले. ही कृषिप्रधान देशाला काळिमा फासणारी घटना आहे. तसेच प्रशासनाच्या निष्क्रियतेवर आणि सरकारच्या उदासीनतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.





