बीड प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती त्वरित जप्त करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यातील वातावरण तापले आहे. हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या घटनेतील काही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील आरोपींची संपत्ती त्वरित जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बुरडे यांना दिले आहेत. बीडमधील बंदुकीच्या परवान्यांच्या संख्येवरूनही राजकारण तापले होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘बंदुकीसोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो समोर आले आहेत, ते जर खरे असतील, तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा. बंदुकीच्या परवान्यांचा फेरआढावा घ्या’, असे आदेश देखील दिले आहेत.
दरम्यान, या घटनेतील 3आरोपी अद्याप फरार आहेत. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान, दुसरीकडे या प्रकरणातील तीन फरार आरोपींचा खून करण्यात आला असून, याबाबत आपल्याला फोन आला होता, असा धक्कादायक दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.




