“जिरली का तुझी…” डायलॉगने बीड कारागृहात भडका; कराड-गित्ते टोळीयुद्धात नवा ट्विस्ट

बीड – बीड जिल्हा कारागृहात “जिरली का तुझी…” या एका डायलॉगने वाल्मिक कराड आणि महादेव गित्ते यांच्यातील टोळीयुद्ध पुन्हा पेटले. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी जोडल्या गेलेल्या या घटनेत कराड आणि सुदर्शन घुले यांना गित्ते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. पण बीड कारागृह प्रशासनाने ही घटना नाकारली असून, याप्रकरणी महादेव गित्तेला छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात हलवण्यात आले आहे. आता या वादात एक नवीन खुलासा समोर आला आहे.
काय घडले कारागृहात?
सोमवारी सकाळी बीड कारागृहात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी हल्ला केल्याची बातमी पसरली. सूत्रांनुसार, हा राडा एकमेकांच्या टोळीवर टोमणे मारल्याने उफाळला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मुद्द्यावरून गित्ते टोळीने कराड गटाला “जिरली का? की अजून जिरायची आहे?” असे टोमणे मारले. यानंतर दोन्ही गटांत हाणामारी झाली.
गित्तेचा मोठा दावा
हल्ल्यानंतर गित्तेला तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात हलवण्यात आले. यावेळी त्याने दावा केला, “वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आमच्यावरच मारहाण झाली आणि आता आम्हालाच दुसऱ्या तुरुंगात पाठवले जात आहे. अक्षय आठवले याचा यात काहीच संबंध नाही.” गित्तेच्या या वक्तव्यमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
संतोष देशमुख हत्येची पार्श्वभूमी –
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे मुख्य आरोपी आहेत. या खटल्यात मकोका कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली असून, ते बीड कारागृहात आहेत. दुसरीकडे, गित्ते आणि त्याच्या समर्थकांचा कराडशी जुना वैर आहे. या वैमनस्यातूनच हा तुरुंगातील संघर्ष उद्भवल्याचे बोलले जाते.
कारागृह प्रशासनाचे स्पष्टीकरण –
बीड कारागृह प्रशासनाने या मारहाणीच्या वृत्ताला खोटे ठरवले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन कैद्यांमध्ये किरकोळ वाद झाला होता, पण त्यात कराड किंवा घुले यांचा सहभाग नव्हता. तरीही या घटनेनंतर काही कैद्यांना दुसऱ्या तुरुंगात हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
दरम्यान, “जिरली का तुझी…” या टोमण्याने सुरू झालेला हा वाद कराड-गित्ते टोळीयुद्धाला नवीन आयाम देत आहे. गित्तेचा दावा आणि कारागृह प्रशासनाचे खंडन यामुळे संभ्रम वाढला असून, या प्रकरणाचा खरा चेहरा काय आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होईल. तोपर्यंत बीडमधील हे टोळीयुद्ध चर्चेचा विषय ठरत आहे.





