वेदनादायी! पोरी तुझा बाप कर्जबाजारी झालाय, गळफास घेतोय, लवकर मातीला ये…म्हणत केली आत्महत्या

बीड – राज्यात कर्जबाजारीतून शेतकरी आत्महत्येच्या घटना रोज समोर येताना दिसून येत आहे. राज्यातील शेतकरी अनेक संकटातून जाताना दिसून येत आहे. यामध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांची स्थिती खूपच बिकट असल्याचे दिसून येत आहे. असे असताना आज मराठवाड्यातील एका शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथे हा प्रकार घडला आहे.
बाळासाहेब लक्ष्मण गोंडे, वय 42 असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून रा. चिंचोटी ता. वडवणी येथील हा शेतकरी आहे. आत्महत्या करण्यापुर्वी बाळासाहेब यांनी आपल्या मुलीला एक फोन केला यावेळी फोनवर मुलीसोबत बोलताना “गिताजंली तुझा बाप खूप कर्जबाजारी झाला आहे. घेतलेले कर्ज फेडू शकत नाही. शेतातील पिक देखील यंदा आले नाही, संपूर्ण पिक वाया गेले आहे. यामूळे मी खूप खचून गेलो आहे. आता तू सासरहून लवकर निघ, मी शेतातील झाडालाच गळफास घेऊन आत्महत्या करत आहे. लवकर मातीला ये ” असा संवाद साधल्यानंतर बाळासाहेब यांनी आपली जिवन यात्रा संपवली.
फोनवरील संवाद झाल्यानंतर लगेच गिताजंलीने चुलत भावाला तिचा आणि वडिलांचा झालेला संवाद सांगितला व काही होण्याआधी शेतात धाव घेण्यास सांगितले. त्यांनतर गिताजंलीचा चुलत भाऊ कालीदासने शेतजवळ असलेल्या त्याच्या पुतण्या युवराज यास फोनवर संपर्क करून बाळासाहेब आत्महत्या करत आहेत. लवकर त्यांच्या शेतात जा. कालिदासने सांगितल्यानंतर लगेच युवराजने बाळासाहेबांकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.





