बीड : शिक्षक साजीद अली हत्याकांडात 5 वर्षांनंतर न्यायालयाचा निकाल; 12 जणांना जन्मठेपेची शिक्षा

बीड – बीड शहरातील बालेपीर भागात 19 सप्टेंबर 2019 रोजी सैनिकी विद्यालयातील शिक्षक सय्यद साजेद अली (वय 37) यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एकूण 18 आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात बीडच्या विशेष मोक्का न्यायालयाने 18 पैकी 14 जणांना दोषी ठरवले होते.
आज झालेल्या सुनावणीत विशेष मोक्का न्यायालयाच्या न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी 14 पैकी 12 आरोपींना वेगवेगळ्या कलमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. उर्वरित दोघांपैकी एकाला पाच वर्षाचा कारावास व पाच लाख रूपये दंडाची तर दुसऱ्याला सहा महिन्याचा कारावास व पाचशे रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
अन्यर खान उर्फ गुजर खान मिर्झा खान (रा. गुलशन नगर बालेपीर बीड), मुजीब खान मिर्झा खान पठाण, सय्यद नासेर सय्यद नुर, सय्यद शाहरूख सय्यद नुर, शेख उवेद शेख बाबु, शेख सरफराज उर्फ सरू डॉन, शेख शहेबाज शेख कलीम (रा. रोशनपुरा बीड), शेख अमर शेख अकबर (रा. गुलशन नगर बीड), शेख बबर शेख युसूफ (रा. खासबाग बीड), आवेज काझी (रा. काझी नगर बालेपीर बीड), शेख इम्रान उर्फ काला शेख रशीद (रा. काझी नगर बालेपीर बीड), शेख मझहर उर्फ काल्या उर्फ हाफ मर्डर शेख रहीम (रा. बांगर नाला बीड) या बारा जणांना अजन्म कमावास म्हणजेच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.




