बीड प्रकरणः महिलेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा; आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक गोव्याला रवाना

बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. आता संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी पुढे आणलेल्या एका महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत मनीषा कारभारी बिडवे या महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. या महिलेचा उपयोग संतोष देशमुखांना गोवण्यासाठी होणार होता, असा आरोप अंजली दमानी यांनी केला आहे. पोस्टमॉर्टम अहवालातून या महिलेचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मृतदेह सडलेल्या अवस्थेत –
मनीषा बिडवे हिचा मृतदेह तिच्या घरात 5 ते 6 दिवसांपासून पडून होता. शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता, सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आज आलेल्या पोस्टमॉर्टम अहवालात मनीषाचा खून झाल्याचे उघड झाले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस गोव्यात
या हत्येचा तपास सुरू करताना पोलिसांना संशयित आरोपी गोव्यात असल्याची माहिती मिळाली आहे. धाराशिव पोलिसांचे एक पथक आरोपीला पकडण्यासाठी गोव्याला रवाना झाले आहे. मनीषा बिडवे हिने यापूर्वी कळंब पोलिस ठाण्यात बलात्काराचे दोन गुन्हे दाखल केले होते, असेही समोर आले आहे. मात्र, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित ज्योती मंगल जाधव आणि मनीषा बिडवे यांचा काहीही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. कळंब पोलिस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
अनैतिक संबंधातून हत्या?
मनीषा कारभारी बिडवे ही बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा गावची रहिवासी होती आणि आडस हे तिचे माहेर. ती कळंबमधील द्वारका नगरी वसाहतीत एकटी राहत होती. मनीषा खासगी सावकारीही करत असल्याची माहिती आहे. पोलिसांना संशय आहे की, अनैतिक संबंधातून तिची हत्या झाली असावी. पोस्टमॉर्टम अहवालानुसार, तिच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला. घराला बाहेरून कुलूप असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जोडून मनीषा बिडवे हत्येचे हे नवे प्रकरण समोर आले आहे. पोस्टमॉर्टम अहवालाने खुनाचा खुलासा केला असून, आता गोव्यातील संशयिताला पकडल्यानंतर हत्येचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील तणाव पुन्हा वाढला असून, पोलिस तपासाची दिशा काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





