Maharashtra Accident : बीड जिल्ह्यात धुळवडीसाठी निघालेल्या चार मित्रांच्या कारचा भीषण अपघात झाला असून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. बीड-शिरूर रोडवरील रायमोहजवळ ही दुर्घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा मुळे हा आपल्या मित्रांसोबत धुळवडीचा सण साजरा करण्यासाठी वॉटरपार्ककडे जात होता. मध्यरात्रीच्या सुमारास बीड-शिरूर मार्गावर कारचा वेग जास्त असताना चालकाचे नियंत्रण सुटले. कार रस्त्याच्या कडेला उलटून थेट विहिरीच्या कठड्याला जाऊन धडकली. सुदैवाने वाहन विहिरीत कोसळले नाही. मात्र या भीषण धडकेत कृष्णा मुळे याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात प्रसाद खोले, यश पेंढारे आणि आणखी एक तरुण जखमी झाले आहेत. त्यांच्या मित्रांची दुसरी कार पाठीमागेच असल्याने त्यांनी तत्काळ जखमींना बीडमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे. अजिंक्यतारा किल्ल्यावर दरीत कोसळून मजुराचा मृत्यू (Maharashtra Accident ) दरम्यान, सातारा शहरालगत असलेल्या अजिंक्यतारा किल्ला येथेही दुर्दैवी घटना घडली. दगड फोडण्याचे काम करत असताना एका मजुराचा पाय घसरून तो सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या मदतीने दरीतून मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणाची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.