Beed Boat Accident : मोठी दुर्घटना ! बीडमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची बोट उलटली
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात (Beed Boat Accident) असलेल्या ऐतिहासिक पुरुषोत्तमपुरी येथे 'अधिक मास' निमित्ताने देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत.

Beed Boat Accident : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात (Beed Boat Accident) असलेल्या ऐतिहासिक पुरुषोत्तमपुरी येथे ‘अधिक मास’ निमित्ताने देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत.
तब्बल तीन वर्षांनंतर हा पवित्र योग आल्यामुळे भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. मात्र, याच गर्दीच्या वातावरणात आज एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे.
गोदावरी नदीच्या पात्रातून (Beed Boat Accident) भाविकांना वाहून नेणारी एक बोट क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्यामुळे अचानक उलटली. या भीषण दुर्घटनेत दोन महिला भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, ४ ते ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
लालसेपोटी प्रवाशांचा जीव धोक्यात
अधिक मासाच्या पर्वणीमुळे पुरुषोत्तमपुरी येथील गोदावरी घाटावर भाविकांची प्रचंड गर्दी आहे. याचाच फायदा उठवत, जास्त कमाई करण्याच्या लालसेपोटी बोट चालकांकडून भाविकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे या दुर्घटनेतून स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षदर्शी आणि दुर्घटनेतून सुखरूप वाचलेल्या महिला भाविकांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या बोटीची (Beed Boat Accident) क्षमता केवळ १० प्रवाशांची होती, त्या बोटीमध्ये चालकाने तब्बल ५० पेक्षा अधिक लोकांना कोंबले होते.
बोट किनाऱ्यावरून सुटण्यापूर्वीच प्रचंड गर्दी झाल्याने अनेक महिलांनी धोक्याचा अंदाज घेऊन खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, बोट चालकाने त्यांना दमदाटी करत, धमकी देऊन बळजबरीने बोटीतच बसवून ठेवले. बोट गोदावरीच्या पात्रात काही अंतरावर पोहोचताच वजनाचा समतोल बिघडला आणि संपूर्ण बोट पाण्याच्या प्रवाहात उलटली.
स्थानिक नागरिकांमुळे मोठा अनर्थ टळला
बोट उलटताच गोदावरीच्या पात्रात एकच एकच हाहाकार उडाला. महिला, पुरुष आणि लहान मुले जिवाच्या आकांताने ओरडू लागली. अनेक महिला भाविकांनी पाण्यात बुडत असताना ‘श्रीस्वामी समर्थ, श्रीस्वामी समर्थ’ असा देवाचा धावा सुरू केला. एका महिलेचा साडीचा पदर बोटीच्याच एका भागात अडकल्यामुळे ती कशीबशी पाण्याच्या वर आली आणि तिचा जीव वाचला.
बोट उलटल्याचे पाहताच किनाऱ्यावर उपस्थित असलेले स्थानिक नागरिक, तरुण आणि तैनात असलेल्या बचाव पथकाने जीवाची पर्वा न करता तात्काळ गोदावरीच्या पात्रात उड्या घेतल्या. त्यांनी तत्परतेने मदतकार्य राबवून पाण्यात बुडणाऱ्या अनेक लोकांना सुखरूप बाहेर काढले. स्थानिक नागरिकांच्या या धाडसामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले आणि मोठा अनर्थ टळला.
दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू, अनेक जखमी
स्थानिकांनी अनेकांना वाचवले असले, तरी या दुर्घटनेत दोन महिलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. मृतकांमध्ये प्रणिला शेषेराव राठोड (वय ५५ वर्षे, रा. लोणार) यांच्यासह अन्य एका महिलेचा समावेश आहे. याशिवाय ५ ते ६ जण पाण्यात जास्त वेळ राहिल्याने गंभीर जखमी झाले आहेत.
यामध्ये सिंधूबाई अर्जुन मावळे (वय ७५ वर्षे, रा. महागाव, जि. वाशीम) यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर जखमींनाही तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
प्रशासनाचा पोकळ दावा; गावकऱ्यांचा तीव्र संताप
या दुर्घटनेनंतर पुरुषोत्तमपुरी परिसरात आणि मृतकांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अधिक मासानिमित्त प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून भाविकांसाठी चोख व्यवस्था आणि सुरक्षा पुरविल्याचा दावा केला होता. मात्र, गावकऱ्यांनी आणि भाविकांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.
नदी पात्रातून प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी साधे ‘लाइफ जॅकेट’ देखील उपलब्ध नव्हते, तसेच घाटावर गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोणतीही पोलीस किंवा प्रशासकीय यंत्रणा नव्हती, असा थेट आरोप नागरिकांनी केला आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच दुर्घटना?
विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वी, म्हणजेच १९ मे रोजी याच गोदावरी नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर तरी प्रशासनाने सावध होऊन नदी पात्रात सुरक्षेचे कडक उपाय योजणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाने त्या घटनेकडे पूर्णपणे डोळेझाक केली आणि त्याच हलगर्जीपणामुळे आज दोन निष्पाप महिलांना आपला जीव गमवावा लागला, अशी भावना व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील चौकशी व कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे धार्मिक यात्रेला गालबोट (Beed Boat Accident) लागले असून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






