पुणे : प्रभागातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी विकासकामांचे प्रकल्प राबवितानाच नगरसेविका म्हणून प्रभागातील परिसराचे सुशोभीकरण आणि सांस्कृतिक जडणघडण करण्यावर आपण भर दिला आहे. भविष्यात अशा कामांनाही आपले प्राधान्य राहणार असल्याचे प्रभाग क्रमांक २२ ‘क’ मधील भाजपच्या उमेदवार अर्चना तुषार पाटील यांनी मतदारांशी बोलताना सांगितले. या वेळी मतदारांकडून या कामांचे विशेष कौतुक करण्यात आले. याबाबत माहिती देताना पाटील म्हणाल्या, की नगरसेविका म्हणून जबाबदारी सांभाळताना आपल्या कार्यकाळात उभारलेली शिल्पे ही प्रभागाची शान आहेत. आम्ही पुलाखालील जागेचा सदुपयोग करून तिथे हिंदवी स्वराज्याचे स्फूर्तिस्थान राजमाता जिजाऊ यांचे शिल्प उभारले. सामाजिक समतेचा संदेश देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘चवदार तळे’ शिल्प आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे शिल्प आज प्रभागाच्या सौंदर्यात भर घालत आहे. याशिवाय नागरिकांसाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विरंगुळा केंद्र ही हक्काची जागा निर्माण केली असून, त्यांची आणि क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची चित्रसृष्टीही उभारली आहे. महर्षी मार्कंडेय यांचे शिल्प आणि माझ्या जनसंपर्क कार्यालयावरील डॉ. अब्दुल कलाम यांची भव्य चित्रसृष्टी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जिद्द निर्माण करत आहे. त्यामुळे मतदारांनी पुन्हा आपल्याला संधी द्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले. भाजपचे कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.