लोणावळा – “गाडीला पुढं जाण्यास साइड न दिल्याच्या कारणास्तव दोन पोलिसांनी तरुणांना मारहाण केली. हा प्रकार लोणावळा शहरात घडला आहे. तरुणाला मारहाण केल्या प्रकरणी संबंधित दोनही पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. सोमवारी (दि. 15) रात्री 10 ते 10.30 वाजण्याच्या दरम्यान पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एलआयसी बिल्डिंगसमोर हा प्रकार घडला.
या प्रकरणी प्रफुल्ल पांडुरंग बोराडे (वय 30, रा. ओळकाईवाडी, लोणावळा) यांनी फिर्याद दिला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीनुसार गाडीला पुढं जाण्यास साईड न दिल्याच्या कारणावरून लोणावळा शहर पोलिसांमध्ये नेमणुकीला असलेल्या जयराज देवकर आणि बंटी अहिनवे यांनी अन्य दोन व्यक्तींसह फिर्यादी प्रफुल्ल बोराडे आणि त्याच्या अन्य तीन मित्रांना शिवीगाळ करीत हाताने व लाथाबुक्कयाने मारहाण करून दमदाटी केली.
या प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांवर गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे.