नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात एका हिंदू विद्यार्थ्याला त्याच्या मुस्लिम शिक्षकाने वर्गाच्या फळ्यावर जय श्रीराम लिहिल्याबद्दल लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. त्यानंतर मुलाला रुग्णालयात दाखल करावे लागले. ही घटना बनी येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
विद्यार्थ्याला मारहाण झाल्याची माहिती मिळताच शेकडोंच्या जमावाने रस्त्यावर येऊन या घटनेचा निषेध केला. त्याचवेळी पोलिसांनी शनिवारी आरोपी शिक्षक आणि मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
पीडित विद्यार्थी नीरज कुमार हा दहावीचा विद्यार्थी आहे. त्याने सांगितले की, सकाळी त्याने वर्गाच्या फलकावर जय श्री राम लिहिले होते. इतक्यात फारुख अहमद नावाचा शिक्षक तेथे आला. त्याला हे करताना पाहून त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रथम त्यांनी वर्गात लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर मुख्याध्यापक कार्यालयात नेले आणि तेथेही बेदम मारहाण केली. शिक्षक मारहाण करत असताना त्यांना कोणी थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही.
प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती
कठुआच्या उपायुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. यामध्ये बानीचे उपविभागीय दंडाधिकारी, कठुआचे उपमुख्य शिक्षणाधिकारी आणि खरोटे सरकारी शाळेचे मुख्याध्यापक यांचा समावेश आहे. समितीने दोन दिवसांत अहवाल सादर करायचा आहे.