प्रभात वृत्तसेवा पुणे – कोथरुडमधील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तीन तरुणींनी थेट पोलिसांवरच समाजमाध्यमातून शारीरिक मारहाणी, अर्वाच्य आणि जातीवाचक, तसेच मानसिक छळ केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. संबंधित पीडित मुलींनी पोलिसांविरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नेमकं काय घडलं? पोलिसांनी याबाबत असे सांगितले की, संभाजीनगरच्या एका विवाहित तरुणीने सासरच्या त्रासाला कंटाळून पुण्यात राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीकडे आसरा घेतला होता. ती कोथरूड परिसरातील तीन तरुणींच्या फ्लॅटवर राहत होती. दरम्यान, विवाहितेच्या सासरच्यांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार संभाजीनगर पोलिसांत दाखल केली होती. त्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक पुण्यात आले. मोबाइल लोकेशनच्या आधारे पोलीस थेट कोथरूडमधील त्या तरुणींच्या घरी पोहोचले. त्यावेळी संबंधित विवाहित महिला बाहेर गेली होती, पोलिसांनी उरलेल्या तिघींवर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र तरुणींनी पोलिसांनी घरात शिरून त्यांचे कपडे तपासले, शारीरिक मारहाण केली आणि त्यांना थेट कोथरूड पोलीस ठाण्यात नेले. तेथेही दबाव टाकत, शिवीगाळ आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला.दरम्यान, कोथरुड पोलिसांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी असे काहीही झाले नसल्याचे सांगत तरुणींनी अशी भूमिका का ? घेतली ते समजत नसल्याचे सांगितले आहे. आम्ही फक्त संभाजीनगर पोलिसांना मदतीसाठी काही महिला कर्मचारी पाठवल्याचे स्पष्ट केले.