सात अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल
पुणे – शाळेत शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची एका विद्यार्थ्याने पटापट उत्तरे दिल्यामुळे शिक्षकांनी वर्गातील इतर विद्यार्थ्यांना रागावले. त्याचा राग मनात धरून मधल्या सुट्टीत सात विद्यार्थ्यांनी मिळून उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर येथील सय्यदनगरमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा प्रकार घडला.
रशीद सिद्दीकी (45, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सात अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादींचा 15 वर्षीय मुलगा सय्यदनगर येथील गुलामअलीनगर भागातील शाळेत शिकतो. काही दिवसांपूर्वी शाळेची मधली सुट्टी झाल्यानंतर फिर्यादींचा मुलगा वर्गात बसलेला असताना त्याच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांनी त्याला घेरले तसेच “तुझे सबकुछ कैसे आता है, मॉं के पेट मे भी पढता था क्या, हर सवाल का जवाब तु क्यों देता है, तुम्हारे कारण हमे टिचर डॉटते है’ असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच, सर्वांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यातील एकाने खिडकीच्या पडदा काढून त्यामध्ये फिर्यादीच्या मुलाचे तोंड गुंडाळले आणि पाईपने बेदम मारहाण केल्याचे तक्रार अर्जात नमूद केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक ए. सी.जोगदंड हे करीत आहेत.